कणकवली ः भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे यांनी केवळ कणकवलीच नव्हे तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना ‘महायुती’ व्हायला हवी अशी भूमिका घेतल्यानंतर आता त्या दृष्टीने दोन्ही पक्षांमध्ये विचारमंथन सूरू झाले आहे. कणकवली नगरपंचायतीमध्येही भाजप-शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्या महायुतीचे संकेत मिळत आहेत. भाजपकडून शहरातील ढालकाठी येथे सुरू करण्यात येणाऱ्या प्रचार संपर्क कार्यालयाच्या कमानीवर भाजपसहीत शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचेही फोटो झळकले आहेत.
सिंधुदुर्गात काही दिवसांपूर्वी भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या नेत्यांकडून स्वबळावर निवडणुका लढविण्याचा नारा देण्यात आला होता. कणकवलीत तर भाजप विरोधात ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र येऊन शहरविकास आघाडी स्थापन करण्याबाबत हालचाली सूरू होत्या, मात्र दोन दिवसांपूर्वी भाजप खा. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात महायुती व्हायला हवी. कार्यकर्त्यांचीही तशी इच्छा असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच कणकवलीत शिंदे शिवसेना जर विरोधकांशी हातमिळवणी करून शहर विकास आघाडी स्थापन करणार असेल तर दोन्ही जिल्ह्यात शिंदे शिवसेनेशी संबंध तोडू, असा स्पष्ट इशारा दिला होता. त्यानंतर शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनीही कणकवलीत अशा प्रकारे ठाकरे शिवसेनेबरोबर जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करत राणेंच्या युती होण्याबाबतच्या मताशी सहमत असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात हालचाली गतिमान झाल्या आहेत. कणकवलीत भाजपच्या प्रचार संपर्क कार्यालयाच्या कमानीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार राष्ट्रवादीचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे, आ. नीलेश राणे, माजी आ. प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे या युतीतील नेत्यांचे फोटो लागले आहेत. त्यामुळे कणकवली न.पं.साठी भाजप- शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांची महायुती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत तशी अधिकृत भूमिका कुणीही स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे याबाबत सर्वांचेच लक्ष लागले आहे.