

दोडामार्ग : तेरवण-मेढे येथे तिलारी जलसंपदा विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या भंगार (स्क्रॅप) विक्रीची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन दीड महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी संबंधित ठेकेदाराला भंगार नेण्याचा आदेश अद्याप न दिल्याने याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. बाजारभावापेक्षा जास्त दराने टेंडर भरल्याचे ठेकेदाराच्या लक्षात येताच तो आदेश निघू नये, यासाठी अटकाव घालत असून अधिकारी मात्र या ठेकेदाराचे चोचले पुरवत असल्याची जोरदार चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.
तेरवण मेढे येथे जलसंपदा विभागाचे भंगार आहे. या भंगार विक्रीची एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन भंगार नेण्यासाठी ठेकेदार आला होता. मात्र याला विरोध करत एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने अधिकाऱ्यावर दबाव आणला. तसेच या भंगाराचे टेंडर आम्हाला का दिले नाही? अशी दमदाटी अधिकाऱ्यांना करू लागले. आपली वरिष्ठ पातळीवर राजकीय ओळख असल्याची बतावणी करू लागले. याला अधिकारी घाबरले व भंगार विक्रीची जुनी प्रक्रिया रद्द केली.
त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी याच भंगार विक्रीसाठी ऑफलाईन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यात सर्वांत जास्त दर सादर करणाऱ्या एका ठेकेदाराची निवड करण्यात आली. मात्र आश्चर्य म्हणजे, तब्बल दीड महिना उलटूनही विभागाने अद्याप कोणताही अधिकृत आदेश काढलेला नाही. हा ठेकेदार याच स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याचा नातलग असल्याची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे, ठेकेदाराने भरलेला दर हा बाजारभावापेक्षा जास्त होता. त्यामुळे व्यवहार विभागाच्या दृष्टीने शासनास फायदेशीर असतानाही आदेश निघत नाहीत, हे अधिकच संशयास्पद ठरत आहे. दरम्यान, ही निविदा स्वतःच्या तोट्याची जाणीव झाल्यानंतर ठेकेदारानेच आता ती रद्द करण्याचा विचार सुरू केल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वीही या विभागाच्या अनेक भंगार विक्रीच्या कायदेशीर प्रक्रिया पार पडल्या. यात तात्काळ भंगार नेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, काही व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थातून आक्षेप घेत अधिकाऱ्यांवर दबाव आणला आणि आपल्या नातलगास टेंडर मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे पारदर्शकतेच्या नावाखाली सुरू असलेल्या या व्यवहारामागे स्वार्थ, राजकारण आणि अधिकारांचा दुरुपयोग हेच घटक असल्याच्या चर्चा तालुक्यात सुरू आहेत.