काजिर्डा धबधबा आजवर दुर्लक्षित
सिंधुदुर्गातील आंबोली पेक्षा रमणीय स्थळ
धबधब्यापर्यंत जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता
पर्यटकांची संख्या वाढून रोजगार वाढणार
राजापूर : राजापूर तालुक्यातील जामदा खोरे परिसरातील काजिर्डा येथील प्रसिद्ध धबधब्याला पर्यटन स्थळ म्हणून मंजुरी मिळावी आणि त्याचा विकास व्हावा म्हणून आमदार किरण सामंत यांनी लक्ष घातले आहे. काजिर्डा धबधबा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी आमदार सामंत यांनी केलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच कोटी रुपयांचा आराखडा बनवला आहे. अंतिम मंजुरीसाठी तो शासनाकडे पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, काजिर्डा येथील धबधबा पर्यटन स्थळ व्हावे म्हणून आमदार सामंत यांनी लक्ष दिल्याने समस्त काजीर्डावासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.
राजापूर तालुक्याच्या पूर्वी परिसरातील जामदा खोरे परिसरात हा धबधबा असून तो बारमाही प्रवाहित राहतो. पावसाळी दिवसांत तर त्याचे सौंदर्य खुलून दिसत असते. तर एप्रिल, मे महिन्याकडे क्षीण बनलेला त्याचा प्रवाह एका धारेवर कार्यरत असतो. असा हा धबधबा आजवर दुर्लक्षित राहिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील धबधब्यापेक्षा जास्त सुंदर आणि रमणीय असा येथील धबधबा असून सह्याद्री पर्वताची रांग आणि मुक्तहस्ते निसर्गाची उधळण झालेला हा धबधबा आहे.
पर्यटन वाढीच्यादृष्टीने या धबधब्याचा परिसर विकसित करणे, धबधब्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करणे, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करणे व भविष्यातील पर्यटन वाढीसाठी पडसाळी-काजिर्डा घाट रस्ता करणे फार गरजेचे असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले.
घाट रस्ता झाला तर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, कर्नाटक येथील पर्यटकांची संख्या खूप वाढेल व त्यामुळे काजिर्डा गावातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल या उद्देशाने काजिर्डा धबधबा पर्यटन क्षेत्र होणे अत्यंत गरजेचे असल्याचे येथील ग्रामस्थांच्या लक्षात आले होते.
त्यामुळे काजिर्डा धबधबा पर्यटनस्थळ विकासासाठी निधी मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे या गावातील प्रकाश पाटील, सुधाकर आर्डे, डॉ. प्रसाद पाटील, अमोल आर्डे, गणेश आर्डे यांच्यासह अनेक ग्रामस्थांना आ. सामंत यांच्याकडे केली होती. याचा विचार करून त्यांनी काजिर्डा धबधबा पर्यटन स्थळ विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
याबाबत प्राप्त माहिती माहितीनुसार सुमारे पाच कोटी रुपयांचा नियोजित आराखडा बनवण्यात आला असून, त्या धबधब्याकडे जाण्यासाठी चांगला रस्ता, यासह तेथील आवश्यक अशा प्राथमिक सुविधा यांचा प्रामुख्याने त्या आराखड्यात समावेश असल्याचे समजते. जर काजिर्डा धबधब्याचा पर्यटन स्थळात समावेश झाल्यास चुनाकोळवणनंतर राजापूर तालुक्यातील तो आणखी एक धबधबा ठरणार आहे.