

राजापूर : शहरात सुसज्ज मच्छीमार्केट असतानाही शिवाजीपथ रस्त्याच्या कडेला बसून मासे विक्री करणार्या मच्छी विक्रेत्यांना आळा घालण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. संबंधित मच्छी विक्रेत्यांना वारंवार ताकीद देऊनही छत्रपती शिवाजी महाराज पथ मार्गावर मासे विक्री करत असल्याने आता नगर परिषद प्रशासनाने दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
नगर परिषदेच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी ही माहिती दिली. शहरातील मुन्शीनाका परिसरात नगर परिषदेने सुसज्ज आणि प्रशस्त असे मच्छीमार्केट उभारलेले आहे.
या ठिकाणी मासे विक्री करण्यासाठी ओटे आणि अन्य सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत तरीदेखील मच्छी विक्रेते छत्रपती शिवाजी महाराज पथ रस्त्यावर मच्छी विक्रेसाठी बसतात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी तसेच दुर्गंधी अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.
छत्रपती शिवाजी महाराज पथ परिसरात मासे विक्रीच्या ठिकाणी अनेकवेळा खवैय्यांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामध्ये अनेकांकडून त्याठिकाणी खासगी दुचाकी, चारचाकी गाड्या उभ्या करून मासे खरेदी केली जाते. ज्या भागामध्ये या महिला मासे विक्रीसाठी बसतात त्या भागामध्ये रिक्षा स्टॅण्डसह चारचाकी गाड्या आणि टेम्पोही रस्त्यानजीक पार्किंग करून ठेवलेले असतात. त्यामुळे या भागामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होते.
अशा प्रकारांविरोधात होत असलेल्या तक्रारीनुसार नगर परिषद प्रशासनाने दखल घेतली असून वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्या मच्छी विक्री करणार्यांविरोधात दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे.