Sindhudurg news file photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg news: स्वच्छ, हरित गाव अभियानात झाराप ग्रा. पं. राज्यात अव्वल

शासनाच्या पंचायत प्रगती निर्देशांक अंतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित गाव अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायत स्वयंमूल्यांकनात महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sindhudurg news

कुडाळ : शासनाच्या पंचायत प्रगती निर्देशांक अंतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित गाव अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायत स्वयंमूल्यांकनात महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरली आहे. हा झाराप गावासाठी मोठा बहुमान आहे. ही ग्रामपंचायत आता केंद्रस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्गच्या नावलौकिकात भर पडली आहे.

केंद्रस्तरीय स्पर्धेत झाराप ग्रामपंचायतीची स्पर्धा तेलंगणा व मिझोरम राज्यातील गावांसोबत आहे. दरम्यान, गावाच्या मूल्यांकनासाठी केंद्रस्तरीय टीम पुढील आठवड्यात झाराप गावात येणार आहे. या स्पर्धेसाठी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थ व प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती कुडाळ पं. स. गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर व झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप ग्रामपंचायतीने 'स्वच्छ व हरित गाव' (Theme 5 - Clean and Green Village) या संकल्पनेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांकाचे नामांकन प्राप्त केले आहे. यामुळे झाराप ग्रामपंचायत देशस्तरीय स्पर्धेस पात्र ठरली आहे. या पार्श्वभूमीवर झाराप ग्रामपंचायत येथे शुक्रवारी आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देण्यात आली. कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पं.स. सदस्य सिताराम तेली, सरपंच दक्षता मेस्त्री, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झारापचे डॉ. प्रसाद देवधर, पं.स. विस्तार अधिकारी संजय ओरोसकर, गजानन धर्णे व संदेश परब, ग्रामपंचायत अधिकारी गंगाराम वेंगुर्लेकर व सतीश साळगावकर, माजी सरपंच स्वाती तेंडोलकर आदींसह गावातील शासकीय कर्मचारी, अंगणवाडी व आशा सेविका, शिक्षक, आरोग्य सेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, पंचायत प्रगती निर्देशांक मधील स्वच्छ व हरित गाव या थीम अंतर्गत स्वयंमुल्यांकनात सन २०२३-२४ मध्ये झाराप ग्रामपंचायत राज्यात अग्रेसर ठरली आहे. आता देशपातळीवरील स्पर्धेत ही ग्रामपंचायत सहभागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर 'यशदा'चे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी गावाला भेट दिली आहे. देश पातळीवर स्पर्धेसाठी ग्रामपंचायतीची संपूर्ण टिम व झारापवासिय सज्ज झाले आहेत. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचेही मोठे योगदान मिळत आहे. गावात स्वच्छ व हरित थीम अंतर्गत सर्व उपक्रम राबविण्यात आले असून याची ही टिम पाहणी करणार आहे. गेल्या आठ दहा दिवसात या ग्रामपंचायतीचे रूप पालटले आहे. पं. स. सदस्य सिताराम तेली, डॉ. देवधर यांनीही मनोगत व्यक्त करत देशपातळीवरील स्पर्धेतही झाराप ग्रामपंचायत अव्वल स्थान पटकावेल, असा विश्वास व्यक्त केला.

देशपातळीवरील स्पर्धेसाठी आम्ही तयार : सरपंच दक्षता मेस्त्री

सरपंच दक्षता मेस्त्री म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाच्या पंचायत प्रगती निर्देशांकात १ ते ९ इंडिकेटरमध्ये स्वयंमूल्यांकनात झाराप ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. आता १ ते ५ इंडिकेटरमध्ये देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी ग्रामपंचायतीसह प्रशासन तसेच सर्व झाराप ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. गावात विविध उपक्रम राबविण्यात आले असून, लोकसहभाग मोठा आहे. गावाची लोकसंख्या दोन हजारांहून अधिक असून, गावात बायोगॅस व सोलार प्रकल्प लक्षवेधी ठरले आहेत. स्वच्छ व हरित गाव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून, देशपातळीवरील स्पर्धेसाठी आम्ही सर्वजण सज्ज झालो आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT