उदय बापर्डेकर
आचरा : गणपती बाप्पाच्या विसर्जनच्या वाटेवरठिक ठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या ... सनईचे सुरेल सूर...बैंड पथकाचे सुश्राव्य वादन...ढोल ताशांचा अखंड गजर... भव्य दिव्य रथ....त्यावरील आकर्षक पुष्प सजावट अन गणेशभक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह... आचरा समुद्रावर काहीसे भावूक झालेले वातावरण.....! पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू.....! आणि बाप्पा घरी जाऊ नये,अशी काहीशी मनामध्ये घर करून राहीलेली भावना.. शनिवारी सायंकाळी विसर्जनाच्या वेळी पाहायला मिळाली.
आचरा येथील इनामदार देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चौघड्यावरचा गणपती आचर्याचा विघ्नहर्ता गणेश मूर्तीचे हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संस्थानच्या शाही थाटात शनिवारी सायंकाळी गेले 39 दिवस समस्त आचरे वासियांनी मनोभावे केलेल्या सेवेचा आस्वाद घेऊन गणपती बाप्पा आपल्या निवासस्थानी परतला. शनिवारी सायंकाळी सवाद्य मिरवणूकीनेे गणपती बाप्पा चे आचरा समुद्रा मध्ये भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.यावेळी गणेश भक्तांचे डोळे पाणावले होते.
उत्सवाच्या सागंता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. दु.12 वा. श्रीच्या मूर्तीचे उत्तरपूजन करण्यात आली. आचरा देऊळवाडी ,मेस्त्रीवाडी ग्रामस्थांनकडून आरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी 1 वा. श्रींच्या विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ झाला. ‘श्री गजानन महाराज की जय’ अशी ललकारी होताच तोफेच्या सलामीने शाही मिरवणुकीची सुरुवात झाली. फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक हळूहळू समुद्र किनारी सरकू लागली. रामेश्वर मंदिर ते आचरा तिठा, बाजारपेठ मार्गे भंडारवाडी, काझीवडा, गाऊडवाडी, आचरा बंदरमार्गे, पिरावाडी देव चव्हाटा येथे काही वेळ गणेश मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली.
झुबेर काझी यांस कडून लाडू तर आचरा ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर यांस कडून शीतपेय तसेच ठीक ठिकाणी वाटेत ग्रामस्थांनकडून शीतपेय, लाडू , मोदक प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आले.
श्रीच्या गणेशमूर्तीचे मच्छीमार बांधवांनीही दर्शन घेतले. सुमारे सहा तास सुरू असलेल्या या विसर्जन मिरवणुकीत आचरा दशक्रोशी ग्रामस्थ,स्थानिक भाविक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा येथील भाविकही सहभागी झाले होते.
मंगल मूर्ती ....मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांनी आचरे गाव दुमदुमून गेला होता. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मिरवणुकीत हिंदू बांधवाबरोबर गावातील मुस्लिम, ख्रिश्चन बांधवही सहभागी झाले होते. मिरवणूक पिरावाडी समुद्र किनारी दाखल झाल्यानंतर श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. मावळत्या सूर्याच्या साक्षीने ‘श्री’ गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्र किनारी भाविकांची एकच गर्दी झाली होती. यामुळे सागराबरोबर जनसागरही उसळल्याचे दृश्य दिसत होते.