कणकवली : यंदा आठ ते दहा दिवस गणपती उत्सव लवकर आला असून यंदा गणपती बाप्पा एसटी महामंडळाला पावला आहे. गणेशोत्सवासाठी यंदा सिंधुदुर्गात मुंबईहून 1142 एसटी गाड्या चाकरमान्यांना घेवून येणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा त्यामध्ये जवळपास 350 ते 400 गाड्या अधिक बुक झाल्या आहेत तर परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत 191 एसटी गाड्यांचे आरक्षण झाले आहे. यामध्ये आणखी वाढ झाली आहे.
गणेशोत्सवासाठी 22 ऑगस्ट रोजी मुंबईहून 4 एसटी बसेस, 23 ऑगस्ट रोजी पालघरमधून 2, ठाणे मधून 11, मुंबईमधून 142, 24 ऑगस्ट रोजी पालघरमधून 9, ठाणे मधून 364, मुंबईमधून 359, 25 ऑगस्ट रोजी पालघरमधून 1, ठाणेमधून 198, मुंबईमधून 52 बसेस सिंधुदुर्गात चाकरमान्यांना घेवून येणार आहेत. एकंदरीत 22 ते 26 ऑगस्ट या कालावधीत पालघरमधून 12, ठाणेमधून 573 तर मुंबईतून 557 अशा एकूण 1142 एसटी बसेस गणेशोत्सवासाठी दाखल होणार आहेत.
त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता सिंधुदुर्ग एसटी विभागाच्या वाहतूक शाखेकडून व्यक्त करण्यात आली तर परतीच्या प्रवासासाठी देखील यंदा चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 30 ऑगस्ट पासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. यासाठी आतापर्यंत 191 गाड्यांचे बुकींग झाले आहे. त्यामध्ये मुंबईला जाण्यासाठी 188 गाड्या तर पुणे भागात जाण्यासाठी 3 गाड्या बुक झाल्या आहेत. यामध्ये मुंबई, परळ, बोरीवली, ठाणे, वसई आदी भागात या जादा गाड्या जाणार आहेत. ग्रुप बुकींगची सुविधाही उपलब्ध करण्यात आली असून त्याप्रमाणे जादा गाड्या सोडणार असल्याचे सांगण्यात आले.