कणकवली : गणेशोत्सव आता अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे डोळे या उत्सवाकडे लागले आहेत. त्यामुळे कोकणात जाणार्या चाकरमानी प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात याव्यात आणि त्या पुढे कायम करण्यात याव्यात, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे आ. भास्कर जाधव यांनी केली. विशेष म्हणजे विधिमंडळातही त्यांनी कोकण रेल्वे मार्ग नक्की कोणासाठी आहे? असा सवाल करत कोकण रेल्वेकडून कोकणवासियांवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी केली.
भास्कर जाधव म्हणाले, 30 वर्षापूर्वी कोकणातील शेतकर्यांची जमिनी दिल्या म्हणून कोकण रेल्वेचे स्वप्न साकार झाले. मात्र ज्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला ,ते कोकणातील चाकरमानी आजही उपेक्षित आहेत. कोकण रेल्वे कोकणातील चाकरमान्यांसाठी फायद्याची ठरेल, असे वाटत असताना चाकरमानी आजही उपेक्षित आहे. सण, उत्सव किंवा खाजगी कामांसाठी मुंबईहून गावी जाताना किंवा गावावरून मुंबईला येताना त्याला आरक्षित तिकिट मिळत नाही. दोन ते तीन महिने आधी बुकिंग करून सुद्धा बर्याचवेळा तिकिट मिळत नाही.
गणेशोत्सवाचे आगाऊ आरक्षण काही मिनिटातच फुल होते. त्यामुळे दोन डब्यांच्या मध्ये मोकळ्या जागेत किंवा शौचालयांजवळ उभे राहून कोकणातील प्रवाशांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे कोकण रेल्वे महामंडळाने कोकणवासियांवरील अन्याय दूर करून विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.