फोंडाघाट : कणकवली-फोंडाघाट मार्गावरील करुळ येथे सध्या नवे अपघात क्षेत्र बनले आहे. पाऊस सुरू झाल्यापासून तीनपेक्षा अधिक वाहने येथे पलटी झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
या मार्गावर कानडेवाडी ते करुळ बाजारपेठपर्यंतच्या रस्त्यावर नेहमी खड्डे पडायचे. पावसाळा आला की वाहनधारकांना खूप त्रास होत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर उपाय म्हणून अलिकडेच या रस्त्याचे नूतनीकरण करताना या रस्त्याची उंची वाढवली. ही उंची वाढवताना खडी आणि डांबरमिश्रित खडी याचे थर वाढवले. त्यामुळे रस्त्याची उंची वाढली खरी, मात्र साईडपट्टीकडे दुर्लक्ष केले.
पूर्वी या भागामध्ये अपघात होत नव्हते. कारण डांबरीकरणाच्या भागाबरोबरच साईडपट्टी मजबुत होती. परंतु नूतनीकरण करताना जवळपास डांबरीकरण भागाची उंची एक फुटापर्यंत वाढविण्यात आली. रस्ता गुळगुळीत झाला परंतु साईडपट्टी बांधली नाही. डांबरीकरणाच्या पातळीपर्यंत साईडपट्टी देखील मजबुत करणे आवश्यक होते, परंतु साईडपट्टीवर केवळ मातीचा भराव टाकला. जसा पाऊस पडला तसा या मातीच्या भरावाचा चिखल झाला आहे. रात्री वाहने येताना आणि पाऊस असताना या मोठ्या वाहनांचे एक चाक साईडपट्टीवर जाते. मग आपोआपच साईडपट्टीमध्ये चाक रुतते.
हळूहळू गाडी पलटी होते. यावर्षी मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून तीन ते चार वाहने एकाच ठिकाणी अशी पलटी झाली आहेत. त्यामुळे करुळ गावात हा एक नवीन अॅक्सीडंट स्पॉट बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने साईडपट्टीचे काम वेळेत केले नाही तर यापुढे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.
फोंडाघाट येथे राहणारे सुरेश पेडणेकर हे शिक्षक संघटनेचे नेते आहेत. त्यांनी या अपघाताच्या क्षेत्राकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. अधिकार्यांना पत्र देऊन या रस्त्याची साईडपट्टी मजबूत करावी, अशी मागणी केली आहे. प्रसंगी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. परंतु इतके अपघात होऊनही आणि आंदोलनाचे इशारे देऊनही बांधकाम विभागाने अद्याप तरी कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही.