वसंत उर्फ प्रतीक प्रकाश वाळके Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident | असलदेत वडाचे झाड दुचाकीवर कोसळून युवक ठार, तिघे जखमी

मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या प्रतीक वाळकेचा जागीच मृत्यू; ग्रामस्थांचा रास्ता रोको

पुढारी वृत्तसेवा

Devgad Nipani Highway Tree Collapse

नांदगाव : देवगड-निपाणी राज्य मार्गावर असलदे उगवतीवाडी येथील श्री साई सर्व्हिसिंग सेंटरसमोर असलेल्या जुनाट व मोडकळीस आलेल्या वडाच्या झाडाची मोठी फांदी अचानक चालत्या दुचाकीवर कोसळल्याने वसंत उर्फ प्रतीक प्रकाश वाळके (वय २५, रा. असलदे, मधलीवाडी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीच्या मागे बसलेला संदेश सखाराम नरे हा गंभीर जखमी झाला असून, सारिका शिवाजी डामरे व शिवाजी रमेश डामरे हे दोघेही किरकोळ जखमी झाले.

हा अपघात मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास असलदे येथे घडला. धोकादायक वटवृक्ष हटविण्याची मागणी यापूर्वी करूनही संबंधितांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता अडवून काही काळ वाहतूक रोखली.

मुंबईहून गणेशोत्सवासाठी असलदे येथे आलेला प्रतीक वाळके हा आपल्या ताब्यातील अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून नांदगाव तिठ्ठा येथे दूध आणण्यासाठी गेला होता. दूध घेऊन घरी परतत असताना उगवतीवाडी येथील सर्व्हिसिंग सेंटरसमोर देवगड-निपाणी मार्गावर अचानक जुनाट वडाच्या झाडाची मोठी फांदी दुचाकीवर कोसळली. या दुर्घटनेत प्रतीकचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीच्या मागे बसलेल्या संदेश नरे याने प्रसंगावधान राखत झाडाची फांदी कोसळताना उडी मारल्याने त्याचा जीव वाचला; मात्र त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. याचवेळी काही अंतर पुढे जात असलेल्या सारिका डामरे आणि शिवाजी डामरे यांनाही फांदीचा मार लागून दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच असलदे येथील ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत युवक असलदे गावातील असल्याचे समजल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. देवगड-निपाणी मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाला ग्रामस्थांनी धारेवर धरत, धोकादायक वटवृक्ष हटविण्याची मागणी करूनही तो का हटविण्यात आला नाही, असा सवाल केला.

दरम्यान, संतप्त नातेवाइक व ग्रामस्थांनी मृताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळेपर्यंत तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. त्यानंतर उशिरा झालेल्या सकारात्मक चर्चेतून तोडगा काढण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे, वृषाली बर्गे, देवगडचे पोलिस उपनिरीक्षक संदीप खाडे, सरपंच चंद्रकांत डामरे, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, उपसरपंच सचिन परब, दयानंद हडकर, पोलिसपाटील वृषाली मोरजकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.

प्रतीक वाळकेच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार भगवान लोके व दिलीप तळेकर यांच्याशी संवाद साधला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, वाळके कुटुंबीयांना मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर दिलीप तळेकर यांनी वाळके कुटुंबीय व ग्रामस्थांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला. पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

प्रतीकच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. त्याचे वडील प्रकाश वाळके हे असलदे ग्रामपंचायतीत नळकामगार म्हणून कार्यरत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एकुलता एक मुलगा गमावल्याने ऐन गणेशोत्सवात वाळके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, असलदे गावासह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT