

कुडाळ : श्री गणपती बाप्पाच्या आगमनासाठी उत्साहाने गावाकडे निघालेल्या मुंबईकर चाकरमान्यांच्या प्रवासाला रविवारी कोकण रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकाचा फटका बसला. मुंबईहून कोकणात धावणाऱ्या बहुतांशी रेल्वेगाड्या निर्धारित वेळेपेक्षा दोन ते तीन तास उशिराने धावत होत्या. काही गाड्यांना त्याहून अधिक विलंब झाल्याने गणेशभक्त आणि चाकरमान्यांना तासनतास रेल्वे प्रवास करावा लागला. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदातच प्रवासाचा मनस्ताप सहन करण्याची वेळ प्रवाशांवर आली.
सोमवार १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांत नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले लाखो चाकरमानी सिंधुदुर्गासह कोकणातील आपल्या मूळ गावी दाखल होत आहेत. गणेशोत्सवासाठी महिनाभर अगोदरपासून सुट्ट्यांचे नियोजन करून रेल्वेची तिकिटे आरक्षित करण्यात आली होती. यंदाही नियमित रेल्वेगाड्यांसोबत विशेष गाड्यांनाही मोठी गर्दी होत आहे.
वाढलेल्या गाड्यांच्या संख्येचा परिणाम
गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक विशेष गाड्या सोडल्या आहेत. नियमित गाड्यांसह विशेष गाड्याही हाऊसफुल्ल गर्दीने धावत आहेत. मात्र, कोकण रेल्वे मार्गावर बहुतांश ठिकाणी एकेरी मार्ग असल्याने गेल्या दोन दिवसांत वाढलेल्या गाड्यांच्या संख्येचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला. एकामागोमाग एक गाड्या धावत असल्याने क्रॉसिंग आणि वाहतुकीच्या नियोजनामुळे अनेक गाड्यांना विलंब झाला.
रविवारी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या अनेक गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे मुंबईतून आदल्या दिवशी प्रवासाला निघालेले चाकरमानी सकाळपासून तासनतास रेल्वेतच अडकून पडले. नियोजित वेळेपेक्षा उशिराने गाड्या स्थानकांवर पोहोचल्याने पुढील प्रवासाचे नियोजनही कोलमडले. पुढे खासगी वाहने तसेच रिक्षाने चाकरमान्यांनी घर गाठले. यात रिक्षा व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले तर चाकरमान्यांना तितकाच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला.