Elephant Issue Dodamarg Meeting  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Elephant Issue Dodamarg Meeting | हत्ती : प्रशासनाला जाग, 13 ला दोडामार्गात बैठक

स्वराज्य सरपंच सेवा संघटनेच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील हत्ती बाधित क्षेत्राची पाहणी करावी व हत्ती बाधित गावातील सरपंच, ग्रामस्थांसमवेत बैठक आयोजित करावी अशी मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी केली होती. या मागणीला यश आले असून 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वा. येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे व हत्ती बाधित क्षेत्राची पाहणी करण्याचे निर्देश उपवनसंरक्षक मिलेश शर्मा यांनी दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांना दिले आहेत.

दोडामार्ग तालुक्यात हत्तींनी शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शिवाय हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकर्‍याला आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर हल्ला करणार्‍या टस्कराला पकडण्याचे आदेश वन विभागाकडून देण्यात आले होते. मात्र गेल्या तीन महिन्यांत यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. तसेच हत्तीला पकडण्याची अंतिम मुदत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना वनविभागाने तत्कालीन मुख्य वनसंरक्षक, तत्कालीन उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी व दोडामार्गचे तत्कालीन वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांची बदली झाली. त्यामुळे हत्ती पकड मोहीम खरंच राबविली जाणार की नाही याबाबत हत्तीबाधित शेतकर्‍यांमध्ये कमालीची साशंकता निर्माण झाली.

स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी हत्ती हटावसाठी वारंवार आंदोलने, उपोषणे केली. त्यांना मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी पाठिंबा दर्शविला. मात्र वनविभागाकडून केवळ कागदी घोडे नाचवले गेले व शेतकर्‍याला ठार केलेल्या हत्तीला पकडण्याची मोहीम केवळ कागदावरच राहिली. त्यामुळे हत्ती हटाव साठी प्रवीण गवस पुन्हा आक्रमक झाले आहेत. हत्ती हटाव साठी वन विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. या मागणीच्या अनुषंगाने वनविभागाने दोडामार्ग वनक्षेत्रपाल कार्यालयात 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वा. हत्ती बाधित गावातील सरपंचांसमवेत एक बैठक आयोजित केली आहे.

हत्तीग्रस्त गावातील सरपंच, ग्रामस्थांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन

उपवनसरंक्षकांच्या उपस्थितीत होणार बैठक

हत्ती बाधित क्षेत्राचीही पाहणी करणार

हत्तीबाधित गावातील सरपंचांना अवगत करण्याचे निर्देश

दोडामार्ग तालुक्यातील हत्ती बाधित गावातील सरपंचां समवेत बैठक आयोजित करणे व हत्ती बाधित क्षेत्राची पाहणी करण्याची विनंती प्रवीण गवस यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक मिशिल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. हत्ती बाधित गावांतील सरपंचांशी संपर्क साधून त्यांना या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून अवगत करावे. तसेच सदर बैठकीबाबत आवश्यक ते नियोजन करावे, असे निर्देश दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांना उपवनसंरक्षकांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT