मालवण : मालवण-बांगीवाडा येथील नवदुर्गा युवा मंडळाच्या दुर्गादेवीचे आगमन यंदा वेगळाच संदेश घेऊन झाले. ‘सन्मान स्त्रीशक्ती’चा या विशेष थीम अंतर्गत आयोजित या सोहळ्याने केवळ उत्साहाचे वातावरण निर्माण केले नाही, तर समाजाला एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दिला. स्वराज्य ढोल-ताशा पथकाने आपल्या दमदार वादनासह महिलांच्या सन्मानावर आधारित फलकांद्वारे प्रभावी जनजागृती केली.
शहरातील वायरी भरडमार्गे बाजारपेठ ते बांगीवाडा असा ढोल-ताशांच्या गजरात दुर्गादेवीचा आगमन सोहळा पार पडला. यावेळी ढोल-ताशा पथकातील पुरुष व महिला सदस्यांनी ‘सन्मान स्त्रीशक्ती’चा ही थीम प्रत्यक्षात आणत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या वादनासह या पथकातील सदस्यांनी हातात घेतलेले फलकांनी या सोहळ्याला सामाजिक रूप दिले.
स्वराज्य ढोल ताशा पथकाचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम शहरवासीयांसाठी लक्षवेधी ठरला. या उपक्रमात शिल्पा खोत, माजी नगरसेवक यतीन खोत, तसेच शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाचे आणि स्वराज्य ढोल-ताशा पथकाचे मालवण व आचरा येथील महिला सदस्य, बांगीवाडा येथील नवदुर्गा युवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.
‘ एक वेळ नवरात्रीचे उपवास नाही केला तरी चालेल, पण स्त्रीचा आदर नक्की करा’, ‘स्त्री ढोल ठोकू शकते, तशी वेळ आल्यावर नराधमालाही ठोकू शकते’, ‘महिलांना द्या सन्मान, देश बनेल महान’, ‘वरवरचा दिखाऊपणा नाही, विचारांचा जागर व्हायला हवा’, ‘मूर्तीतील देवीसोबतच घरातल्या स्त्रीचाही आदर व्हायला हवा’ अशा आशयाचे प्रभावी संदेश या मिरवणुकीतून देण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने शहरवासीयांना आकर्षित केले आणि त्यातून एक सकारात्मक विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.