दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा
दोडामार्ग वीजधर राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरण कामावरून तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले असताना तहसीलदारांच्या दालनात झालेल्या एका 'गुप्त बैठकी'ने संशयाची ठिणगी पेटवली आहे.
ठेकेदार, संबंधित विभागाचे अधिकारी आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस विरोधक, स्थानिक सरपंच, नगरसेवक आणि पत्रकारांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. ही बैठक नेमकी कोणत्या उद्देशाने घेण्यात आली? सर्वसामान्यांच्या समस्यांवर चर्चा झाली की काहींच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच खलबतं रवली गेली? अशा संतप्त प्रतिक्रिया आता उघडपणे उमटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, बैठकीत नेमके काय ठरले? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून संपूर्ण प्रकरण गूढ पडद्याआड ठेवले गेले आहे.
दोडामार्ग वीजघर राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले. मात्र या कामाबाबत सत्ताधारी व प्रशासन वगळता सर्वच अनभिज्ञ आहेत. हे काम नियमानुसार न होता, सर्वसामान्यांच्या जीवाची काळजी न घेता केले जात असल्याचा आरोप होत आहे. काम सुरू झाले आणि अपघाताची मालिकाच सुरू झाली. एका व्यक्तीला अपघातात जीव गमवावा लागल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली आहे.
ठेकेदाराने निकृष्ट दर्जाच्या कामाचा सपाटा सुरू केल्याचा आरोप विरोधक, ग्रामस्थ, वाहनचालक करत आहेत. मात्र शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरच ठेकेदार, संबंधित विभागाचे अधिकारी, तालुका वासियांची बैठक लावण्याचे दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते.
मात्र कामाची कूर्मगती, वाढते अपघात व कामाचा निकृष्ट दर्जा यांमुळे सर्वसामान्यांचा संताप अनावर होऊ लागला. त्यांनी लवकरच रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला अन् झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदारांनी तत्काळ लोकप्रतिनिधी म्हणून फक जि.प. व पं.स. सदस्यांना पत्र पाठवत दोन ठेकेदार, संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसह एक बैठक सोमवारी स्वतःच्या दालनात लावली.
या बैठकीला विरोधक, नगरसेवक, मार्गालगत असलेल्या गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना मुद्दाम डावलले. विरोधकांना का डावलले? हा मार्ग वीजघर, मुळस, मेढे, पाळये, तिलारी, कोनाळ, वायंगणतड, साटेली-भेडशी, झरेबांबर, झरे-1 व 2, आंबेली या गावांसह दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतून जातो.
या बैठकीला लोकप्रतिनिधी म्हणून फक्त जि.प. व पं.स. सदस्यांना बोलावण्यात आले होते. बैठकीची माहिती इतर सरपंच, उपसरपंचांना समजताच तेही बैठकीला हजर झाले. पण त्यांना बैठकीला मज्जाव करण्यात आल्याचे समजते. शिवाय या बैठकीला सत्ताधारी वगळता एकही विरोधक नव्हता. त्यामुळे त्यांना जाणूनबुजून डावलल्याची चर्चा आहे.
सर्व जबाबदारी प्रशासन व सत्ताधारी घेणार का?
रस्त्याच्या कामाबाबतही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मंजूर आराखड्यानुसार सात मीटर रुंद रस्ता व दोन्ही बाजूंना दीड मीटर बाजूपट्टी अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे काम होत आहे का? याबाबत शंका आहे. मार्गालगतची धोकादायक झाडे न हटवल्याने भविष्यात मोठे अपघात होण्याची भीती आहे. शिवाय मार्गावर साटेली-भेडशी व दोडामार्ग या दोन प्रमुख बाजारपेठा आहेत.
साटेली-भेडशी ग्रा.पं. सदस्य गणपत डांगी यांनी ग्रामस्थांसोबत लवकरच बैठक घेऊन बाजारपेठेतून रस्ता कसा होणार? याची माहिती ग्रामस्थांना द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. याचे अद्याप कोणतेही उत्तर दिले गेले नाही. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवला असून अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत रस्त्याचे किती काम होणार? असुरक्षिततेमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी हे सत्ताधारी व प्रशासन घेणार का? असे सवाल उपस्थित होत आहेत.