

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
कोकणाचा हापूस आंब्याचे उत्पन्न यंदा ८० टक्क्यांनी कमी झाल्यामुळे केवळ २० टक्के उत्पन्न झाले आहे. दुसरीकडे आखाती देशात युद्धाचा भडका कायमच आहे. परदेशात मागणी असूनही आंबा निर्यातीस फटका बसत आहे. नैसर्गिक आपत्ती, जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे सावट असूनही कोकणाचा हापूस आंबा युनायटेड किंगडम म्हणजेच यूकेच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे.
त्याठिकाणी भारतीय चलणानुसार प्रति डझन २६०० रुपये (२६ पाऊंड) इतका विक्रमी दर मिळत आहे. इंग्लंडसह इतर देशात हापूसची मागणी वाढलेली आहे. हवामानाच्या फटक्यामुळे यंदा आंब्याचे उत्पन्न खूप कमी झाले आहे. मागील वर्षी एप्रिलच्या महिन्यातच कोकणाचा हापूस आंबा आखाती देशातसह इतर देशात जात होता.
मात्र यंदा अमेरिका-इस्रायल व इराणच्या युध्दामुळे बाजारपेठेला फटका बसला असून निर्यात ठप्प झाली आहे. भारतातील विविध राज्यात आंब्याची विक्री होत आहे. दरम्यान, युध्दामुळे विमान वाहतुकीवर मोठी बंधने आली असून याचा थेट परिणाम निर्यातीवर झाला असून एरवी १५० ते २०० रूपये प्रति किलो असणारे विमान भाडे आता ३५० ते ४०० रूपयापर्यंत पोहोचले आहे.
भाड्यात दुप्पट वाढ होवूनही, हापूसची जागतिक मागणी लक्षात घेता ग्लोबल कोकणच्या माध्यमातून यशस्वी निर्यात करण्यात आली आहे. लांजा, राजापूर, वेंगुर्लेचा आंबा यूकेत यूकेमध्ये विक्रेते तेजस भोसले यांनी ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांच्याशी संपर्क साधून ही मोहीम आखली. लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले येथील बागायतदारांडून१ हजार डझन आंबे निर्यात केलेली आहे. वाशी बाजार समितीमध्ये आवश्यक प्रक्रिया आणि फायटो सर्टिफिकेट प्राप्त केल्यानंतर हा माल विमानाने युकेला
रत्नागिरी हापूस म्हणून कर्नाटक, गुजरातच्या आंब्याची विक्री
यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे कोकणात म्हणावा तितका आंबाच उपलब्ध नाही. आहे तेवढा आंबा देशातील विविध राज्यात विक्री करण्यास सुरू आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे सोलापूर, सांगली, सातारासह इतर जिल्ह्यात रत्नागिरीचा हापूस आंबा म्हणून कर्नाटक, गुजरातचा आंबा विक्री होत आहे. त्यामुळे हापूस आंबा खरेदी करताना ग्राहकांनी खात्री करून खरेदी करणे गरजेची आहे.
यंदा कोकणात आंबा उत्पादन २० टक्केच झाले आहे. पूर्वी एप्रिलमध्येच परदेशात आंबा निर्यात व्हायचा; मात्र आखाती देशात युद्ध सुरू असल्यामुळे त्याचा फटका आंब्याला बसला आहे. अशा परिस्थितीतही रत्नागिरीचा हापूस आंबा यूकेत पोहोचला आहे. मात्र युद्धाच्या परिणामुळे हवाई खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना परवडत नाही.
- मिलिंद जोशी, रानागिरी, पणन विभाग