दोडामार्ग : गोव्यातून वझरे येथे कोळसा वाहतूक करणारा दहा चाकी ट्रक पलटी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी आयी येथे घडली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ट्रकचे नुकसान झाले आहे.
गोवा येथून वझरे येथील एका कंपनीला कोळसा वाहतूक करणारा ट्रक मंगळवारी आयीमार्गे येत होता. येथील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला. सुदैवाने तो यातून बचावला. अपघाताची माहिती स्थानिकांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले.
अपघातामुळे रस्त्यालगत असलेल्या संरक्षक कटड्याची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रक काढण्यासाठी मशिनरी आणली असता स्थानिकांनी त्याला तीव्र विरोध केला. ट्रक अजिबात काढायला देणार नाही, अशी तंबी उपस्थित ग्रामस्थांनी दिली. या मार्गे मोठ्या प्रमाणात दहा चाकी ट्रक मधून ओव्हर लोड कोळसा वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीमुळे आयी, माटणे, वझरे गावातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गोवा, आयी, ते वझरे मार्गावरून हे ट्रक रात्रीच्या वेळी अवैध कोळसा वाहतूक करतात. या कोळसा ट्रक मुळे यापूर्वी अनेक अपघात झाले. मात्र पोलिस गांधारीच्या भूमिकेत असतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला. या नियमबाह्य कोळसा वाहतुकीला प्रशासन अभय देत असून ग्रामस्थांना त्याचा नाहक ञास सहन करावा लागत आहे. ट्रक रात्रीचे चालवले जातात व कर्ण कर्कश आवाज करत सर्वांची झोपमोड करतात. त्यामुळे यामार्गे होणारी वाहतूक पूर्णतः बंद करा अशी मागणी उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी केली.