दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा
राजकारण, समाज आणि भावकीत गट-तट पडल्याचे आपण नेहमीच पाहतो; पण आता चक्क हत्तींसारख्या बुद्धिमान प्राण्यांच्या कळपातही दोन गट पडल्याचे अनोखे चित्र दोडामार्ग तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील केर, मोर्ले परिसरात वावरणारा ६ हत्तींचा कळप आता फुटला असून, यामुळे वन विभाग आणि स्थानिक शेतकऱ्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे.
अशी पडली कळपात फूट
शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता हा कळप मोर्ले परिसरात एकत्र दिसला होता. मात्र, त्यानंतर ते विभक्त झाले. बाहुबली टस्कराच्या नेतृत्वाखालील कळपातील एक ज्येष्ठ मादी हत्तीण दोन पिल्लांसह वेगळी झाली असून, ती सध्या घोटगेवाडी परिसरात वावरत आहे. तर बाहुबली टस्कर एका छोट्या मादीसोबत पाळये गावातून पुढे सरकत बांबर्डे परिसरात धुमाकूळ घालत आहे.
फेब्रुवारी महिन्यात बाहुबलीचे तिलारी खोऱ्यात आगमन झाल्यानंतर गणेश टस्कराने तिथून जे पलायन केले, तो अद्याप परतलेला नाही. बाहुबलीच्या नेतृत्वाखाली सर्व हत्ती एकत्र राहतील हा वन विभागाचा अंदाज फोल ठरला आहे. दुसरीकडे, या कळपापासून पूर्वीच वेगळा झालेला ओंकार हत्ती शनिवारी मध्यरात्री सासोलीतून गोवा हद्दीत दाखल झाला होता. मात्र, रविवारी सायंकाळी तो पुन्हा सासोली कळणे सड्यावर माघारी परतला. त्यामुळे त्याला गोव्यातून हुसकावून लावले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.