नांदगाव : देवगड-निपाणी राज्य मार्गाच्या नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या नांदगाव तिठ्ठा ते फोंडाघाट तिठ्ठा या टप्प्यात हे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस वेळे अगोदरच दाखल झाल्याने मार्गावरील नांदगाव ते फोंडा तिठा या टप्प्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. यावर उपया म्हणून ठेकेदार कंपनीने कच्चे सिमेंट काँक्रीट टाकून एक लेन तयार केली. मात्र त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. मोर्या टाकलेल्या भागात रस्ता खचला. या रस्त्याच्या निकृष्ट कामाचा पोलखोल झाली आहे.
देवगड-निपाणी या 66 किलोमीटर लांबीच्या राज्य मार्गाचे दुपदरीकरण कॉक्रीटने करण्याच्या कामासाठी 331 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मार्च 2025 अखेर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. सध्या या मार्गाचे नांदगाव तिठ्ठा ते फोंडाघाट तिठ्ठा दरम्यान काम प्रगतीपथावर आहे. जुना डांबरीकरण रस्ता पूर्ण उखडून त्यानंतर माती, खडी, कच्चे काँक्रीट व त्यानतंर हायटेक मशिनरीच्या सहाय्याने काँक्रिटीकरण, असा रस्ता केला जाणार आहे. सध्या फोंडा तिठ्ठयापासून मार्गावर एका लेनच काँक्रिट काम सुरू आहे. दुसरी लेन मातीची असल्यान पावसाने ती चिखलमय बनली होती. यामुळे या लेनवर कच्चे सिमेंट काँक्रीट टाकण्यात आले आहे. तर या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दरम्यान मार्गावर ज्या ठिकाणी मोर्यांचे बांधकाम केले आहे, या भागात रस्ता खचल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहेत. फोंडाघाट तिठ्ठापासून काही अंतरावर सिमेंट काँक्रीट लेन टाकण्यात आली आहे. तर पुढे वाघेरी, बावशी, तोंडवली परिसरात एका लेनवर कच्चे सिमेंट काँक्रीट घालून तात्पुरती वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मार्गावरील मोर्यांचे काम निकृष्ट झाल्याचे दिसत आहे.
कामाच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या निकृष्ट कामाची पोलखोल होत असल्याने नागरिक , वाहन चालक व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. सार्व. बांधकाम विभागाचे अभियंता व लोकप्रतिनिधींनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या पावसामुळे रस्त्याचे काम बंद आहे. यामुळे गणेशभक्त व चाकरमान्यांना या रस्त्यावर्रूीन प्रवास करताना चिखल व खड्ड्यांमधूनच मार्गक्रमण करावे लागणार आहे.