बांदा : इन्सुली आणि डोबाशेळ परिसरात रानहत्ती ‘ओंकार’ पुन्हा सक्रिय झाला असून, भात कापणीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हत्तीने शेतातील उभी पिके तसेच कापून ठेवलेल्या उडव्यांचे प्रचंड नुकसान केल्याने कापणीचे काम थांबले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हत्तीकडून झालेल्या नुकसानीमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. ‘वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेले पीक काही क्षणांत नष्ट होताना बघणे अत्यंत वेदनादायक आहे. वनखात्याकडून मिळणारी नुकसानभरपाई ही केवळ औपचारिकता आहे. आमच्या घराचा उदरनिर्वाह या शेतीवरच अवलंबून असून मोठे आर्थिक संकट ओढावले आहे,’ असा उद्विग्न स्वर शेतकऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, ग्रामस्थांनी वनखात्यावर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ‘ओंकार’ हत्ती जंगलाकडे परतत असतानाही काही कर्मचारी त्याला पुन्हा वस्तीच्या दिशेने वळवतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.