

बांदा : बांदा परिसरात गेल्या काही दिवसांपासून थांबलेल्या ‘ओंकार’ हत्तीने पुन्हा एकदा दहशत माजवली आहे. वाफोली-आईरवाडी येथील मंगेश उत्तम आईर यांच्या मालकीच्या गाभण म्हशीवर हत्तीने हल्ला केल्याने म्हशीचा मृत्यू झाला. तुळसाण पुलाजवळील नारळ-फोफळी बागेत ही घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेत आईर यांचे सुमारे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
बुधवारी रात्री साधारण 11 वा.च्या सुमारास ओंकार हत्ती थेट बागेतील गोठ्यात घुसला आणि म्हशीवर हल्ला केला. हल्ला एवढा जबरदस्त होता की, म्हशीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बांदा वनपरिक्षेत्रातील वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक अतुल पाटील यांच्यासह वन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांसह पंचनामा करून नुकसानाची नोंद केली. ओंकार हत्तीचा बांदा, इन्सुली आणि वाफोली गावातील वावर गेल्या काही दिवसांत वाढत असल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी हत्ती वस्तीत येऊ लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.