सावंतवाडी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत (वय 62) यांचे मंगळवारी निधन झाले. सकाळी ते माजगाव येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. याबाबत डॉ. अभिजित चितारी यांनी दुजोरा दिला.
काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते. सिंधुदुर्ग बँक संचालक, शिखर बँक संचालक, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशी अनेक पदे भूषवली होती. सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल, शांतीनिकेतनसारख्या अनेक शैक्षणिक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी चौकुळ, दोडामार्गसारख्या दुर्गम भागांत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शाळा, ज्युनिअर कॉलेज सुरू केले.
जीवनाच्या अखेरपर्यंत ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून राहिले. माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांचे ते चिरंजीव होत. अभ्यासू, मनमिळावू व स्वच्छ चारित्र्याचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. जिल्ह्याच्या राजकारणातील ते अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व नियोजन सभापती म्हणूनही त्यांनी यशस्वी काम केले.
‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्वाचे त्यांनी नेहमीच पालन केले. विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.
गेले काही दिवस ते आजारी होते. तशाच अवस्थेत त्यांनी आपले राजकीय आणि सामाजिक काम सुरू ठेवले होते. नुकताच त्यांचा 62 वा वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळाकडून धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात मुलगा विक्रांत, नातू कु. कबीर उर्फ शौर्य, नात कु.नाव्या, भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे.
विकास सावंत यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी माजगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी सकाळी 9 ते 11 वा. या वेळेत येथे राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात ठेवण्यात येणार आहे. त्यांचे सुपुत्र विक्रांत सावंत हे परदेशी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ते बुधवारी सकाळी सावंतवाडीत पोहोचणार आहेत.