

कुडाळ : मराठी हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आहे; हा विषय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मर्यादित ठेवणे योग्य नाही. मराठीचा मुद्दा हा सर्वांचा विषय आहे. याच मराठीच्या विषयावरून ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली, या शिवसेनेत सिंधुदुर्गातील अनेक मंडळी मुंबईत आहेत, त्या सर्वांची मूळ गावे आजही सिंधुदुर्गातच आहेत. आता दोन भाऊ ठाकरे एकत्र आले आहेत, मराठी बांधवानी त्यांना घेऊन पुढे गेले पाहिजे, असे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खा.अरविंद सावंत यांनी व्यक्त केले. राज्यात सत्तेत असलेली माणसे केंद्रापुढे लाचार असल्याची टीका त्यांनी केली.
कुडाळमध्ये झालेल्या एका आंदोलनातील कोर्ट केसच्या कामासाठी खा. अरविंद सावंत मंगळवारी कुडाळ न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. तालुकाप्रमुख राजन नाईक, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन बोभाटे, अतुल बंगे आदी उपस्थित होते.
खा.सावंत म्हणाले,मी मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलो तरी माझा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाशी फारसा संबंध येत नाही, आज ठाकरे बंधू मराठीच्या मुद्यावर एकत्र आले आहेत, कुठलीही गोष्ट एकत्र आली की नैसर्गिकपणे ताकद वाढतेच, ती तशी वाढलेली आहे. महाराष्ट्राची निर्मिती भाषावार प्रांतरचना झाल्यावर देशात अनेक राज्यांची निर्मिती झाली. मात्र महाराष्ट्राची निर्मिती झाली नव्हती. मुंबईसाठी 107 हुतात्मे द्यावे लागले; तेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली. ही मुंबई मराठी माणसाने आपले रक्त सांडून मिळवली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये मराठी भाषेचा ठसा मजबुतीने राहिला पाहिजे. मराठी माणूस राहिला पाहिजे, मराठी माणूस टिकला पाहिजे,मराठी संस्कृती सुद्धा टिकली पाहिजे असे खा.सावंत यांनी सांगितले.
खा.सावंत म्हणाले, महाराष्ट्रातील मराठी बांधवांना धमकी देण्याची हिंमत छत्तीसगडमधील खासदाराला होतेच कशी? तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे खाणी आहेत, सगळे उद्योग गुजरातकडे आहेत.मराठी माणूस तुम्ही आमच्या पैशावर जगता, असे तो म्हणत आहे. अशावेळी भाजपच्या मराठी नेत्यांना त्याची लाज वाटत नाही काय? असा सवाल त्यांनी केला. कोण कोण कुठला माणूस महाराष्ट्राला आव्हान देतो व त्यांच्यासोबत हे मिंधे गप्प बसले आहेत, अशी ईकघा त्यांनी केली.
उद्धव ठाकरे सोडून एकघाही राजकारण्याला केंद्राला आव्हान देण्याची हिंमत नसल्याचे ते म्हणाले. आज रोज संविधानाची हत्या होत आहे. यांच्या ओठात एक आणि पोटात एक आहे, त्यांचा हा कावा आपल्याला ओळखता आला पाहिजे. अशी माणसं दुर्दैवाने महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत आणि केंद्रापुढे लाचार होऊन बसली आहेत. त्यामुळे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आपण घालवून बसलो आहोत. निवडणुकीत मतदानाचे कसे आकडे वाढले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेत, अशी टीका त्यांनी राज्यातील सत्ताधारी महायुतीवर केली.
तामिळनाडूत जाऊन अशा पद्धतीने तमिळ विरोधात बोलून दाखवा. ज्यावेळी दूरदर्शन हे एकमेव टीव्ही चॅनेल होते, त्यावेळी तामिळनाडू राज्यात तामिळी भाषेतूनच प्रादेशिक बातम्या दूरदर्शनवरून प्रसारीत केल्या जात होत्या, असा दावा खा. सावंत यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडून गेलेले सत्ताधारी पक्षातील आमदार अधिक आहेत, खासदारही आहेत,तरीसुद्धा स्थानिकांना परप्रांतीयांकडून करून मारहाण होते. ही हिंमत त्यांना कुठून आली? देशाचे पंतप्रधान आरोप करतात आणि ज्यांच्यावर आरोप करतात ती लोक काही दिवसात मंत्री पदाची शपथ घेतात, हे दुर्दैव असल्याची खंत खा.सावंत यांनी व्यक्त केली.