सिंधुदुर्ग

देवगडमध्ये ‘खाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती’ विषयावर २७ ऑक्टोबरला एकदिवसीय परिषद

मोहन कारंडे

देवगड; सूरज कोयंडे : कोकणातील ज्या उद्योजकांना 'खाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती' या विषयात उद्योग सुरू करायचा आहे, अशा उद्योजकांसाठी एकदिवसीय परिषद दि. २७ ऑक्टोबर रोजी तसेच तीन दिवसीय प्रत्यक्ष प्रशिक्षण शिबीर दि. २७ ऑक्टोबर त २९ ऑक्टोबर पर्यंत देवगड येथे आयोजित करण्यात आले आहे.

या परिषदेला व प्रशिक्षणाला खाऱ्या पाण्यातील कोळंबी या विषयात गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेले आणि तारी अॅक्वा फार्म या कंपनी अंतर्गत यशस्वीरीत्या व्यवसाय करत असलेले काशीनाथ तरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हा उद्योग कसा उभारायचा? किती गुंतवणूक लागते? सरकारी पाठबळ कशा पद्धतीने मिळू शकते? अडचणी आणि आव्हाने नेमकी कोणती आहेत? या संबंधी मार्गदर्शन मिळणार आहे.

'खाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती' या व्यवसायाला जगभर खूप मागणी आहे आणि हा असा व्यवसाय आहे जो कोकणाला आर्थिक दृष्ट्या समृद्ध करू शकतो. कोकणातील उद्योजकांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये या उद्योगा विषयी जागृती आणि या उद्योगामध्ये यशस्वीपणे कार्य केलेल्या उद्योजक व तज्ञ मार्गदर्शकांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आणि पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना आणि राज्य सरकार यांच्या समन्वयातून एक मोठी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प असल्याचा कोकण क्लब आणि कोकण बिजनेस फोरमचे संस्थापक संजय यादवराव यांनी बोलताना सांगितले.

परिषद आणि प्रशिक्षण शिबीर मोंड गाव (ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग) येथे सकाळी १० ते ६ या वेळेत होणार आहे. तीन दिवसीय प्रशिक्षणासाठी येणार्‍यांसाठी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था सशुल्क उपलब्ध असेल. ज्यांना या परिषदेला आणि प्रशिक्षण शिबिराला उपस्थित रहायचे आहे, त्यांनी अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी कोकण क्लब आणि कोकण बिझनेस फोरमचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्हा संघटक उत्तम दळवी व सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष बी एस राणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संजय यादवराव यांनी केले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT