सावंतवाडी ः सावंतवाडी नगरपालिकेत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगराध्यक्षा आणि 11 नगरसेवकांनी अधिकृत आपला स्वतंत्र गट स्थापन केला. जिल्हाधिकार्यांकडे तसे पत्र सादर केले. या गटाच्या प्रमुखपदी (गटनेते) नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन भाजपच्या लोकप्रतिनिधींनी गट स्थापनेचे अधिकृत पत्र त्यांना सुपूर्द केले. या गटामध्ये नगराध्यक्षांसह एकूण 11 नगरसेवकांचा समावेश आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयाकडे अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. हा गट स्थापन करण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत. : भाजप पॅनेलमधून निवडून आलेल्या नगरसेवकांची भविष्यात कोणतीही फोडाफोडी होऊ नये व पक्षाची ताकद आणि नगरसेवकांमधील समन्वय टिकवून ठेवणे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर श्रद्धाराजे भोसले आणि सर्व नगरसेवकांनी आगामी काळात शहराच्या विकासात्मक कामांसाठी एकत्र आणि समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी नगरपालिकेत भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.