कणकवली : पुढारी वृत्तसेवा
पुढील चार वर्षांत भजनी कलाकारांसाठी अधिकाधिक योजना, मानधन, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल. भजन सदन उभारणी, कलाकार मानधन वाढ, तसेच पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथे आयोजित तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. भजनी कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाव, त्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी न्याय मिळावा, या उद्देशाने कणकवली येथे आयोजित 'तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे' उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते येथील भगवती मंगल कार्यालयात झाले.
भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेवक राकेश राणे, ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज, भजनी कलाकार समिती अध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष प्रकाश पारकर, माजी सभापती बुलंद पटेल, सुरेश सावंत आदी उपस्थित होते. पालकमंत्री नीतेश राणे म्हणाले, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आपल्या कोकणातीलच आहेत. तसेच मंत्रिमंडळात माझ्या शब्दाला वजन असल्याने, पुढील चार वर्षांच्या काळात भजनी कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
भजनी कलाकार समिती अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संतोष कानडे यांनी आपल्या पदाला खऱ्या अथनि न्याय दिला आहे. वारकरी संप्रदाय आणि भजनी कलाकारांना सरकारशी जोडणारा एक भक्कम दुवा म्हणून ते कार्यरत आहेत. योग्य व्यक्तीच्या हाती नेतृत्व गेल्यावर संस्थेचा कायापालट कसा होतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांच्या प्रश्नांसाठी संतोष कानडे सातत्याने पाठपुरावा करत असतात. महाराष्ट्रातील इतर कलांप्रमाणेच कोकणातील या समृद्ध भजन संस्कृतीची दखल सरकारने घेणे आवश्यक आहे. सरकारकडे देण्याची क्षमता मोठी आहे, फक्त त्यांना या गोष्टींची जाणीव करून देणारे नेतृत्व हवे असते, असे मंत्री राणे म्हणाले. संतोष कानडे म्हणाले, गेल्या ३० वर्षांत भजनी कलाकारांना कोणीही दाद दिली नव्हती, कोणीही ओळखही केली नव्हती. ती ओळख निर्माण करण्याचे काम पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले, त्यामुळे या स्पर्धेला 'पालकमंत्री चषक' हे नाव दिले आहे.
भजनी कलाकार हा अजूनपर्यंत वंचित होता. महायुतीचे सरकार आल्यावर मंत्री राणे यांनी भजन कलाकारांना न्याय देण्याचे काम केले. भजनी कलाकारांना कोठेही मानधन मिळत नव्हते. मात्र मंत्री राणे यांनी मला कलाकार मानधन समितीचा अध्यक्ष केल्यानंतर भजन कलाकारांना जे २२०० रुपये एवढे मानधन होते ते पालकमंत्री राणे यांनी सरकारकडे सततचे पत्रव्यवहार व पाठपुरावा करून ५ हजार रुपये एवढे करून घेतले.
सर्व भजनी कलाकार एकाच छताखाली रहावेत, यासाठी कणकवलीत भजन सदन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी जागाही निश्चित करण्यात आली आहे. त्याचे बांधकाम काही दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. कानडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले. कार्यक्रमाला वारकरी बांधव तसेच भजनी कलावंत, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकऱ्यांना पंढरपूर येथे आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे. खा. नारायण राणे यांच्याशी चर्चा देखील करणार आहे. पंढरपूर येथे जागा घेतली आहे. त्याठिकाणी येत्या दोन ते तीन वर्षांत वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या वारकरी भवनामध्ये निवास व्यवस्था, भोजन, स्वच्छतागृहे तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, पंढरपूर वारीच्या काळात तसेच इतर वेळीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.नितेश राणे, पालकमंत्री-सिंधुदुर्ग