कुडाळ : भारत सरकारने हवामान माहिती संकलन व विश्लेषण प्रणाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व 432 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हवामान स्वयंचलित यंत्रे बसविण्यात येणार आहेत. यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत जागा निवड प्रक्रिया पूर्ण करून देण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला कळवले आहे. जागा निवडी नंतर या सर्व ग्रा. पं. चे प्रस्ताव राज्यस्तरीय अंमलबजावणी समितीकडे 10 सप्टेंबरपूर्वी पाठवणे आवश्यक आहे.
हवामानातील बदलामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते; मात्र नुकसान भरपाईसाठी अचूक हवामानाची नोंद महत्त्वाची असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत 57 पैकी 46 महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे बसवली आहेत. मात्र, या हवामान केंद्रांकडून सर्व गावातील हवामानाचा व पावसाची अचून नोंद मिळत नाही; परिणामी शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहतात. यासाठी भारत सरकारने प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याबाबत निर्णय घेतला आहे. यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व 432 ग्रामपंचायतींमध्ये स्वतंत्र स्वयंचलित हवामान यंत्रे बसविण्यात येणार आहेत.
या प्रणालीद्वारे स्वयंचलित यंत्रणा वापरून हवामानाशी संबंधित घटकांची माहिती (जसे तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वार्याचा वेग व दिशा) सातत्याने संकलित केली जाते. ही माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीद्वारे विश्लेषित होते आणि शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जाते. यामुळे शेतकरी, प्रशासन, संशोधक आणि हवामान तज्ज्ञ यांना अचूक आणि स्थानिक माहिती वेळेत मिळते.
स्वयंचलित हवामान यंत्रांमुळे सध्याचे किमान-कमाल तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वार्याचा वेग आणि दिशा, वायुभार यांची परिपूर्ण नोंद उपलब्ध होणार आहे. या माहितीमुळे त्या-त्या गावात झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळू शकते. पूर्वी महसूल मंडळात एका गावात जरी तीव्र पाऊस पडला तरी संपूर्ण महसूल मंडळातील गावांना नुकसानभरपाई मिळत होती; मात्र आता तशी नुकसानभरपाई मिळणार नाही. ज्या गावात हवामानातील बदलामुळे पिकांचे नुकसान झाले, त्यांनाच नुकसानभरपाई मिळणार आहे.