एआय-आधारित नवीन हवामान अंदाज प्रणाली क्रांतिकारी
वॉशिंग्टन ः संशोधकांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून विकसित केलेली नवीन हवामान अंदाज प्रणाली पारंपरिक पद्धतीपेक्षा कित्येक पटींनी वेगवान आणि अधिक प्रभावी ठरू शकते. ही प्रणाली ‘आर्डवार्क वेदर’ (Aardvark Weather) नावाने ओळखली जात असून, पारंपरिक हवामान अंदाज प्रणालींपेक्षा काही दशांश वेगाने भाकिते तयार करते आणि त्यासाठी फक्त थोडे संगणकीय सामर्थ्य वापरते. नेचर या प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये 20 मार्चला प्रसिद्ध झालेल्या अहवालात याबाबत माहिती दिली आहे.
‘सध्याच्या हवामान अंदाज प्रणालींना विकसित होण्यासाठी दशकांपेक्षा जास्त काळ लागला आहे, पण केवळ 18 महिन्यांत आम्ही अशा प्रणाली तयार केली आहे जी अत्यंत कमी डेटावर आणि डेस्कटॉप संगणकावर कार्य करू शकते, असे युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्बि—ज (यूके) येथील अभियंता रिचर्ड टर्नर यांनी सांगितले. सध्या हवामान अंदाज अत्यंत गुंतागुंतीच्या भौतिकशास्त्रीय मॉडेल्सच्या आधारे तयार केले जातात, ज्यासाठी सुपर कॉम्प्युटर आणि तासन्तास प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते. मात्र, आर्डवार्क वेदर या एआय प्रणालीने हा प्रक्रिया वेळ मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. ही प्रणाली उपग्रह, हवामान केंद्रे, जहाजे आणि हवामान बलूनमधून मिळालेल्या कच्च्या डेटावर आधारित अंदाज वर्तवते. विशेषतः उपग्रह डेटाचे योगदान खूप महत्त्वाचे असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. ही नवीन पद्धत पारंपरिक हवामान अंदाज प्रणालींमध्ये क्रांती घडवू शकते. कारण ती अधिक स्वस्त, वेगवान आणि अचूक आहे. पारंपरिक प्रणालींना सुपर कॉम्प्युटर आणि तज्ज्ञ टीमची आवश्यकता असते, तर आर्डवार्क वेदर डेस्कटॉप संगणकावर काही मिनिटांत हवामान अंदाज तयार करू शकते. संशोधकांनी या प्रणालीची तुलना अमेरिकेच्या ग्लोबल फोरकास्ट सिस्टीम (ॠऋड) शी केली. केवळ 8 टक्के उपलब्ध डेटा वापरून आर्डवार्क वेदर प्रणालीने ‘जीएफएस’ पेक्षा चांगले परिणाम दिले आणि युनायटेड स्टेटस् वेदर सर्व्हिसच्या अंदाजाइतकीच अचूकता दाखवली.

