आंबोली - आजरा रोडवर दुचाकी घसरून आदित्य कोरवी याचा मृत्यू झाला.  Pudhari News Network
सिंधुदुर्ग

आंबोली-आजरा रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात; आजरा येथील तरुण ठार

नांगरतास वळणाचा अंदाज न आल्याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

आंबोली: पुढारी वृत्तसेवा : आंबोली - आजरा रोडवर दुचाकी (एमएच ०९ एफ पी ९१२२) घसरून झालेल्या अपघातात आदित्य भिकाजी कोरवी (वय १९, रा. आजरा, जि. कोल्हापूर) हा दुचाकीस्वार ठार झाला. दगडावर डोके आपटल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२६) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली.

दरम्यान, आजरा येथून बुधवारी आदित्य कोरवी व त्याचे मित्र ओंकार (कार्तिक) कारेकर (वय १९, रा. रवळनाथ कॉलनी, आजरा), वेदांत कोंडूरसर (वय १६, रा. सोहाळे, ता. आजरा) हे आणि इतर मित्र दुपारी आजरा येथून कावळेसाद पॉइंट येथे आले होते. कावळेसाद पॉइंट पाहून झाल्यानंतर तिघेजण आणि त्यांचे मित्र पुन्हा आजरा येथे जाण्यास निघाले.

यावेळी आंबोली - आजरा रस्त्यावर नांगरतास इसावा वळणाचा अंदाज न आल्याने ते तिघेजण विरुद्ध दिशेला जाऊन पडले. यात आदित्य याचे डोके दगडावर आदळून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या ओंकार कारेकर आणि वेदांत कोंडूसकर यांना किरकोळ दुखापत झाली.

अपघाताची माहिती ओंकार (कार्तिक) कारेकर यांनी आंबोली पोलिसांत दिली. तर अपघाताची घटना कळताच आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आदित्यचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

आदित्य हा आजरा महाविद्यालयात बीए प्रथम वर्षामध्ये शिकत होता. तसेच तो एका ठिकाणी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. मृत आदित्य याच्या पश्चात आई व छोटी बहीण असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT