अपघातातील जखमी महिला. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Ashadhi Wari Return Accident | आंबोलीनजीक कार अपघातात गोव्यातील चार भाविक जखमी

आषाढी वारीवरून परत येताना घाटकरवाडी येथे कार पलटली; दोन जखमी, दोन गंभीर

पुढारी वृत्तसेवा

आंबोली : घाटकरवाडी (ता. आजरा) येथे पंढरपूरहून आजरा मार्गे गोवा असा प्रवास करणार्‍या गोवा येथील भाविकांची व्हॅगनआर कार पलटी होवून अपघात झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले, पैकी दोघे गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

आतुर्ली, मये, डिचोली, गोवा येथील भाविक दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पायी वारीने पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. रविवारी आषाढी वारीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी इतर ठिकाणीही देवदर्शन घेतले. सोमवारी पहाटे 3.30 वा. च्या सुमारास हे सर्व भाविक पंढरपूर येथून कारने परत गोव्याला आपल्या गावी निघाले. वाटेत आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे त्यांच्या कारला अपघात झाला. समोरून भरधाव येणार्‍या गाडीचा अंदाज न आल्याने कार चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन पलटी झाली.

या अपघातात कारमधील रिमा रत्नाकर चोडणकर (57, रा. आतुर्ली, मये, डिचोली, गोवा) आणि स्नेहल शिवराम नागवेकर (62) यांना गंभीर दुखापत झाली. तर दिव्या देवानंद कवठणकर (48) आणि शिवराम नारायण नागवेकर (67, सर्व रा. आतुर्ली, मये, डिचोली-गोवा) या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

घाटकरवाडी हे घटनास्थळ आंबोलीपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर असल्याने, सर्व जखमींना ताबडतोब त्यांच्या दुसर्‍या गाडीने आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. अदिती पाटकर आणि डॉ. महेश जाधव यांनी जखमींना प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT