Pudhari
सिंधुदुर्ग

Devgad Ambergris Seized | देवगडमध्ये ८ कोटींचे अंबरग्रीस जप्त; तिघांना अटक; बनावट ग्राहक तयार करून रचला सापळा

देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे वनविभागाची धाडसी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Whale Vomit Seized Sindhudurg

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे वनविभागाने धाडसी कारवाई करत सुमारे ८.८०० किलो वजनाचे आणि अंदाजे ८ कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त केली आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तळेबाजार परिसरात अंबरग्रीस विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला. आरोपी विक्रीसाठी आल्यानंतर त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

अटकेत घेतलेल्या आरोपींमध्ये योगेश गणपत करंजेकर (रा. इळये), विष्णू धाकू धुरत (रा. आनंदवाडी) आणि संतोष काशीराम नाडणकर (रा. वरेरी) यांचा समावेश आहे. या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.

ही कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक वनसंरक्षक डॉ. एस. के. लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली एस. एस. पाटील, वनपाल मठ सावळा कांबळे, वनपाल दिगवळे सर्जेराव पाटील, वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट, पोलीस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक मिठबाव आप्पासो राठोड, वनरक्षक ठाकूरवाडी रामदास घुगे, वनरक्षक दिगवळे प्रतिराज शिंदे तसेच सागर भोजने, संग्राम पाटील, अनिल गावडे व चालक मंदार नाईक यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांची माहिती मिळाल्यास तत्काळ प्रशासनाला कळवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT