

कुडाळ : निरुखे - सुतारवाडी येथील बेकायदा बंदूक निर्मितीप्रकरणी कुडाळ पोलिसांनी अधिक तपास करीत मुख्य संशयित जगन्नाथ मेस्त्री याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार व तेथे मिळालेल्या मुद्देमालानुसार आणखीन चार संशयितांना ताब्यात घेत अटक केली. दरम्यान संबंधित संशयितांकडे अजून तीन बंदुका मिळाल्या असून एकूण बंदुकांची संख्या सहा झाली आहे. नव्याने ताब्यात घेतलेल्या चार संशयितांना बुधवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.
निरुखे -सुतारवाडी येथे बेकायदेशीररीत्या सुरू बंदूक निर्मिती कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३ तयार बंदुका, ६ बॅरल आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री (६५) याला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान मेस्त्री यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर यामध्ये अजून चार जणांची नावे समोर आली आहेत. यामध्ये दयानंद कदम (33, रा. असरोंडी ), आग्नेल डिसोझा ( ३२, रा. भडगांव बुद्रुक ), योगेश तावडे (२८, रा. ओरोस) व सिद्धेश मराठे ( २९, रा. कडावल) यांना मंगळवारी रात्री उशीरा अटक केली.
यामध्ये डिसोजा याच्याकडे एक बंदूक व १० काडतुसे तर मराठे याच्याकडे दोन बंदुका, गन पावडर शरे असे साहित्य मिळाले आहे. मेस्त्री याच्याकडे मिळालेल्या तीन बंदुकांपैकी दोन बंदुका दुरुस्तीसाठी आल्या होत्या. त्या योगेश तावडे व दयानंद कदम यांच्या असल्याचे निष्पन्न झाले. श्री. मेस्त्री याच्याकडे बंदुका दुरुस्तीचा परवाना आहे. मात्र दुरुस्तीसाठी आलेल्या या दोन बंदुकाधारकांकडे बंदुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी योगेश तावडे व दयानंद कदम या दोघांना अटक केली. दरम्यान, अजून एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला असून याबाबतची पुढील कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणांमध्ये पोलिसांचे धाडसत्र सुरू असून अजूनही काही संशयित हाती लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या या चारही संशयीतांना कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुरुदास पाडावे करीत आहेत.