Sindhudurg News : श्वानाच्‍या नाकाने शोधला जंगलात हरवलेला श्वास!

खानोलीत बेपत्‍ता झालेल्‍या मतिमंद युवकाला मिळाले जीवदान
Sindhudurg News
श्वानाच्‍या नाकाने शोधला जंगलात हरवलेला श्वास!
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : 'ज्याचे दैव बलवत्तर असते, त्याला कोणत्याही संकटातून निसर्ग तारून नेतो', असे म्हणतात. पण या संकटावर मात करण्यासाठी जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि नशिबाची भक्कम साथ लागते. याचाच अंगावर काटा आणणारा प्रत्यय वेंगुर्ले तालुक्यातील खानोलीमध्ये आला आहे. सलग तीन दिवस घनदाट जंगलात, वन्य प्राण्यांच्या संकटात, अन्नाशिवाय बेपत्ता असलेल्या एका मतिमंद युवकाला चक्क मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

ग्रामस्थ आणि अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे जिथे अपयशी ठरले, तिथे सिंधुदुर्ग पोलिसांच्या श्वान पथकातील ‘मायलो' (डॉग) खऱ्या अर्थाने देवदूत ठरला आणि एका हरवलेल्या श्वासाला पुन्हा नवसंजीवनी मिळाली.

असा हरवला मनीष...

कसवण-तळवडे (ता. कणकवली) येथील मनीष जयेश राऊळ हा २३ वर्षीय युवक मतिमंद आहे. त्याला बोलता येत नाही आणि तो अडखळत चालतो. रविवारी (२६ एप्रिल) तो आपल्या बहिणीसोबत खानोली-तळेवाडी येथे मावशीकडे आला होता. मात्र, रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास तो घरातून अचानक बाहेर पडला आणि बेपत्ता झाला. तो कुठे गेला, याचा कोणालाच थांगपत्ता लागेना. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी सलग तीन दिवस संपूर्ण परिसर पिंजून काढला. आधुनिक ड्रोन कॅमेऱ्याचीही मदत घेण्यात आली, पण मनीषची कोणतीही माहिती मिळाली नाही. जसजसा वेळ जात होता, तसतशी सर्वांची चिंता वाढत होती.

अन् 'मायलो' मैदानात उतरला...

अखेर कोणताही मार्ग न दिसल्याने सिंधुदुर्ग पोलिसांच्या डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास श्वान 'मायलो'सह डॉग हँडलर शेखर मोरजकर, श्री. वेंगुर्लेकर, निखिल चव्हाण आणि पीएसआय रवींद्र गाडेकर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्षणाचाही विलंब न करता मोहीम सुरू झाली. ‘मायलो’ला मनीषच्या पँटचा वास देण्यात आला. वास मिळताच मायलोने वेगाने दिशा पकडली आणि तब्बल ३ किलोमीटरचे अंतर पार करत घनदाट जंगलात अचूक माग काढला.

पाण्यावर जिंकली मृत्यूशी झुंज!

बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास खानोलीच्या जंगलमय भागात एका घळणीखाली, ओहोळाच्या बाजूला मनीष ग्रामस्थांना आणि पोलिसांना आढळून आला. सलग तीन दिवस पोटात अन्नाचा कण नसल्याने तो घायाळ झाला होता. आजूबाजूला वन्य प्राण्यांची आणि इतर संकटे आ वासून उभी असताना, मनीष केवळ त्या ओहोळाच्या पाण्यावर जगला. तो जिवंत आणि सुखरूप असल्याचे नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मनीषला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. ज्याला शोधताना माणसांची आणि तंत्रज्ञानाची दमछाक झाली, ते अवघड काम लीलया फत्ते करणाऱ्या 'मायलो' श्वानाचे आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या संपूर्ण पथकाचे ग्रामस्थांनी मनोमन आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news