सावंतवाडी ः सावंतवाडी-सालईवाडा परिसरातील रवींद्र मंगल कार्यालयासमोर घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा उलगडा झाला असून, हा अपघात एका अल्पवयीन मुलाने वडिलांची इनोव्हा कार चालविताना घडविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित इनोव्हा कार पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 24 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वा.च्या सुमारास एका अल्पवयीन चालकाने इनोव्हा कार (चक 04 ऋअ 4554) ही सावंतवाडी -शिरोडा मार्गावर भरधाव वेगाने चालवत रस्त्याच्या बाजूला उभ्या टाटा 207 डी.आय. जनरेटर व्हॅनला जोरदार धडक दिली. धडकेनंतर संबंधित कार रवींद्र मंगल कार्यालयाच्या दर्शनी भागातील विटांच्या कंपाउंडच्या भिंतीतही जाऊन आदळली.
या अपघातात जनरेटर वाहनाचे तसेच मंगल कार्यालयाच्या संरक्षक भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात घडवून अल्पवयीन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. तसेच आनंद मेस्त्री यांनी आरोपी चालकाला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप असून, या दोघांविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अमित रवींद्र आरवारी (रा. सालईवाडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गुन्ह्यातील इनोव्हा कार जप्त केली.सुरुवातीला ही घटना ‘हिट अँड रन’ असल्याचे समजत होते. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून हा अपघात अल्पवयीन मुलाने घडविल्याचे स्पष्ट केले.
या घटनेचा अधिक तपास हवालदार अनिल धुरी व महेश जाधव करीत आहेत. सध्या अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास परवानगी देणाऱ्या पालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याचे वाढते प्रकार चिंताजनक असून पालकांनी अधिक जबाबदारीने वागावे, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.