

खानिवडे : उत्तर भारतातील अनेक राज्यात जशी राईची शेती पिवळ्या फुलोऱ्याने आपले मन मोहवून टाकते.त्या प्रमाणे मागील दोन तीन वर्षांपासून वसईत मनमोहक पिवळ्या फुलोऱ्यात बहरलेली शेती आता दिसून येत आहे.
ही पिवळी फुललेली शेती पाहताना अतिशय मनमोहक दिसते. असे वाटते की उत्तर भारतात आपण फिरत आहोत. मात्र हे दृश्य उत्तर भारतातील शेतीचे नाही.तिकडच्या सरसो आणि इकडच्या राई च्या शेतीचे वाटावे असे जरी असले तरी पण ही शेती राई लागवडीची नसून ताकड पिकाची ही शेती पिकलीय वसईत.
वसईच्या पूर्व ग्रामीण भागात आता सर्रास पिवळ्या फुलोऱ्यात फुललेली शेती दिसून येत आहे. हिवाळ्यात आता या भागात हे पीक घेतले जात आहे. ज्या शेतीचे उत्पादन आहे तागडा. वसईचे मुख्य खरीप पीक म्हणजे भात शेती. ती आता कसणे हे म्हणजे खिशातले 100 रुपये संपवून निसर्गाच्या लहरीपणामुळे निदान 80 तरी मिळावे अशी आशा जरी शेतकरी ठेवत असले तरी भात शेतीत तेही मिळत नाहीत. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातील पिकेही नेहमी बदलणाऱ्या हवामानात हवी तशी होत नाहीत. त्यात वसईच्या विकास कामांच्या गराड्यात धुळीच्या साम्राज्यात कठवळ पिके म्हणावी तशी जोमदार होत नाही.
यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांमध्ये रब्बी पिकांपेक्षा हमखास उत्पादन मिळणारे तागडा हे पीक चांगले उत्पादन ठरू लागले आहे. त्यामुळे सहज आणि कसेही वातावरण बिघडले तरी नक्की पीक देणारे हे नकदी पीक घेण्याकडे आता वसईचे शेतकरी वळले आहेत.जास्त उत्पादन देणाऱ्या ह्या पिकाला दरही जास्त मिळत आहे.तोही तयार शेतीच्या बांधावर येऊन व्यापारी घेऊन जात असल्याने पीक उत्पादन विकण्यासाठी होणारी वणवण आता शेतकऱ्यांची होत नाही.