ओरोस ः वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण, कणकवली या चार नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ना भाजप-शिवसेना युती होऊ शकली की ना महाविकास आघाडी स्थापन होऊ शकली. भाजपने चारही नगरपालिकांमध्ये काही अपवाद वगळता सर्वच जागांवर आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिंदे शिवसेनेनेही कणकवली वगळता इतर तीनही नगरपालिकांमध्ये बहुतांशी जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जशी भाजप-शिवसेना युती होऊ शकली नाही तशी ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची महाविकास आघाडीही सर्व ठिकाणी होऊ शकली नाही.
17 नोव्हेंबर या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत चारही नगरपालिकांमध्ये मिळून 390 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी 31 तर नगरसेवकपदांसाठी 359 अर्जांचा समावेश आहे. कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी स्थापन होऊन त्यामध्ये चक्क शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटही सामील झाले आहेत. भाजप विरुद्ध शहर विकास आघाडी अशी लढत कणकवलीत होत आहे. शिंदे शिवसेनेने मात्र मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्लेमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उतरवले आहेत. वेंगुर्लेमध्ये ठाकरे शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी तिथे काँग्रेसचे विलास गावडे यांचा अर्ज दाखल झाल्यामुळे तिथे महाविकास आघाडी फिस्कटली आहे. भाजपचे राजन गिरप यांचाही अर्ज दाखल झाला आहे. अर्थात तिथे शिंदे शिवसेनेच्या उमेदवारानेही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सावंतवाडीत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलीच आहे. आमदार दीपक केसरकर यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करून युती होईल का प्रयत्न केले, परंतु तिथे युती होऊ शकली नाही. त्यामुळे केसरकर यांनी शिंदे शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. तिथे ठाकरे शिवसेनेनेही नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला असला तरी काँग्रेसनेही आपला उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरवला आहे.
मालवणातसुद्धा युती होऊ शकली नाही. भाजपच्या शिल्पा खोत यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेच्या ममता वराडकर यांच्यात लढत होणार असून ठाकरे शिवसेनेनेही पूजा करलकर यांना रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे कुठल्याही शहरात जशी युती झाली नाही तशी महाविकास आघाडीही स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 21 ही असून तोपर्यंत काही घडामोडी झाल्या तरच युती किंवा आघाडी होऊ शकते. मात्र या शक्यता खूपच धुसर बनल्या आहेत. ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.