

सुनील सकटे
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गटातटाच्या असल्याने नगरपालिका निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आता महानगपालिका निवडणुकीत स्वबळ की युती, आघाडी याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. युती, आघाडी म्हणून लढताना अनेक प्रभागांत नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. नेत्यांची अवस्था ‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय’ अशी होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेत फिस्कटलं आता महापालिकेत काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुतीतील घटक पक्षांसमोर अडचणी आल्या आहेत. स्थानिक पातळीवर गटातटामुळे महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. चंदगडमध्ये भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. कमी -अधिक प्रमाणात जिल्ह्यात अशीच परिस्थिती असल्याने नेत्यांची कसरत सुरू आहे. नगरपालिका नगरपंचायतीच्या जागा आणि इच्छुकांची संख्या, गटातटाचे राजकारण याचा विचार करता या निवडणुकीस महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणे कठीण होत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत तर इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. अशातच घटक पक्षात विशेषत: शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. तसेच यापूर्वी कार्यरत महापालिकेतील ताराराणी आघाडी सध्या सुप्त अवस्थेत आहे. या आघाडीचे काही माजी नगरसेवकही आज इच्छुक आहेत. ताराराणी आघाडी आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने ऐनवेळी कोण कोणती भूमिका घेईल, याचाही परिणाम होणार आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत युती, आघाडी की स्वबळाचा नारा, याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे. महानगरपालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होत आहे. एका प्रभागात प्रत्येक प्रवर्गात आघाडी आणि युतीकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रत्येक प्रवर्गात प्रत्येक घटक पक्षातील इच्छुकांची संख्या पाहता युती, आघाडी केल्यास बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे. ऐन निवडणुकीत बंडखोरी होणे कोणत्याही पक्षास परवडणारे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला तगड्या उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी ताकद लावावी लागणार आहे.
प्रत्येक प्रभागात उमेदवारीसाठी चढाओढ
प्रत्येक प्रभागात प्रत्येक प्रवर्गातील घटक पक्षातील इच्छुकांवर नजर टाकल्यास उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात चढाओढ असल्याचे चित्र आहे. एखाद्याची उमेदवारी निश्चित केल्यास इतर घटक पक्षांतील इच्छुकांची नाराजी अंगलट येण्याचा धोका आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी कायम राहणार की दोन्हीकडे स्वबळाचा नारा होणार, याकडे शहरवासीयांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.