रत्नागिरी : जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार नौकांना मासेमारी हंगाम सुरू झाला तेव्हा काही दिवस चांगल्या प्रमाणात कोळंबी मिळाली. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून फिशमिल कंपन्यांना लागणारी तारली किंवा हैद मासळीचा रिपोर्ट चांगला मिळू लागला आहे. मधल्या काळात नौकांच्या डिझेलचा खर्चही निघत नव्हता.
पावसाळी मासेमारी बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर पारंपरिक मासेमारी 1 ऑगस्टपासून सुरू झाली. मासेमारीच्या सुरुवातीच्या काळात काही दिवस चालू आणि व्हाईट कोळंबी चांगल्या प्रमाणात मिळत होती. त्यावेळी चालू कोळंबीचा किलोचा दर 170 रुपये तर व्हाईट कोळंबीचा दर 400 रुपये इतका मिळत होता, असे मच्छीमार नेते दिलावर गोदड यांनी सांगितले. त्यानंतर पारंपरिक नौकाना मासळी मिळेनाशी झाली होती. नौकेसाठी लागणार्या डिझेलचा खर्चही वसूल होईल, इतकी मासळी मिळत नव्हती. पारंपरिक मच्छीमारीच्या ट्रॉलिंग, गिलनेट नौकांना गेल्या दोन दिवसांपासून तारली मासा चांगल्या प्रमाणात मिळू लागला आहे. परंतु मधल्या काळात मासळी मिळेनाशी झाली तेव्हापासून तारली मिळण्यास सुरुवात झाली आहे, तोपर्यंत प्रत्येक नौकामालक 15 ते 20 लाख रुपये तोट्यात होता, असे मच्छीमार नेते अब्दुल बिजली खान यांनी सांगितले.
पर्ससीन नेट मासेमारी नौकांना राज्य शासनाच्या समुद्र क्षेत्रात म्हणजे 12 नॉटिकल मैलपर्यंत मासेमारी करण्याचा परवाना नाही. मात्र, या नौका केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील म्हणजे 12 नॉटिकल मैल बाहेर समुद्रात मासेमारी करण्यास जात आहेत. पर्ससीन नेट नौकांची मासेमारी ही अजून फारशी फायद्यात नाही. काही नौकाना बांगडा मासा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. पारंपरिक मासेमारी नौकांना मिळणारी तारली मासळी फिशमिल कंपन्यांसाठी विकली जाते. सध्या पारंपरिक मच्छीमार नौकांना ही मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असून, ती फिशमिल कंपन्यांना 15 ते 16 रुपये किलो दराने विकली जात आहे. हा दर रोजच्या रोज बदलत असतो.