चिपळूण शहर : नव्या बाजारपुलाजवळ दररोज अशाप्रकारे वाहतूक कोंडी होत आहे. Pudhari Photo
रत्नागिरी

रत्नागिरी : नवीन बाजार पूल परिसरात वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : पुढारी वृत्तसेवा

बाजारपेठेत वाशिष्ठी नदीवरील पूल परिसरात सध्या वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. बाजारपेठेकडून पेठमाप, गोवळकोट, कालुस्ते तसेच वालोपेकडे जाणारी वाहने तर बाजारपेठ व शहराकडे येणारी वाहने यामुळे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पुलावर कोंडीत अडकून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. एक दिशा मार्ग असल्याने अनेक वाहने व वाहनचालक चुकीच्या पद्धतीने जात असल्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

बाजारपेठ वाशिष्ठी नदी परिसरात दहा वर्षांपूर्वी नवा पूल उभारण्यात आला. जुना फरशी पूल वाहतुकीला अपुरा पडत होता. तसेच अवजड वाहने नेण्यास तो धोकादायक ठरल्याने या पुलानजिकच सुमारे तीस फूट रुंदीचा नवीन पूल दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आला. मात्र, या पुलावर देखील आता वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. गोवळकोट-कालुस्ते परिसराला जोडणारा गोवळकोट खाडीवरील पुलाचा वापर सुरू झाल्यामुळे कालुस्ते पंचक्रोशितील अनेकांना चिपळुणात येण्यासाठी जवळच्या मार्गाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यातच वालोपे, पेठमाप आदी परिसरातील नागरिक शहर बाजारपेठेत येण्यासाठी नव्या पुलावरून मोठ्या प्रमाणात येत आहेत.

या ठिकाणी बॅ. नाथ पै चौकातून नाईक कंपनीमार्गे मच्छी मार्केट, उक्ताड, मिरजोळी व गुहागरकडे जाण्यासाठी एक दिशा मार्ग आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसेससह वरील ठिकाणी जाणारी अनेक वाहने नाईक कंपनी एक दिशा मार्गे जातात. पुलाच्या पलीकडील बाजूकडून येणारी वाहने देखील बाजारपेठेत येण्यासाठी पुलाच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे एक दिशा मार्गाने जाण्यासाठी वळत असतात. एक दिशा मार्गावरून जाणारी सर्व वाहने एकाचवेळी एकत्र आल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो.

वाहतूक पोलिस कर्मचार्‍याची आवश्यकता

गोवळकोट, कालुस्ते, पेठमाप, वालोपेकडे पुलावरून जाणारी वाहने उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जाताना दोन्ही बाजूच्या वाहनांना अडचणीचे ठरू लागले आहे. यातूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी नसल्याने मोठ्या प्रमाणात कोंडीचा त्रास वाहनचालकांना होऊ लागला आहे. त्यातच एक दिशा मार्गाचे उल्लंघन करणार्‍यांमुळे देखील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT