राजापूर : राजापूर तालुक्यातील देवीहसोळ गावावर शुक्रवारी दुःखाचा डोंगर कोसळला. उपचारास झालेल्या विलंबाने एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत झाला. श्रवण विकास भोवड असे या मृत मुलाचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुका सुन्न झाला आहे. एका हसत्या-खेळत्या फुलाच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
श्रवणला त्रास होऊ लागल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तपासणीअंती त्याला सर्पदंश झाल्याचे निदान झाले. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
मात्र, शरीरात विष जास्त भिनल्याने आणि उपचारास विलंब झाल्याने अखेर शुक्रवारी (दि. 8) पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. मनमिळावू आणि शांत स्वभावाच्या श्रवणच्या अनपेक्षित जाण्याने भोवड कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. या घटनेमुळे संपूर्ण देवीहसोळ गावावर शोककळा पसरली असून, एका कोवळ्या जीवाच्या मृत्यूने परिसर हळहळत आहे.
देवीहसोळ येथील लिंगवाडीत राहणार्या श्रवणला सर्पदंश झाला, मात्र ही गोष्ट सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आली नाही. त्यामुळे त्याच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत. काही वेळाने त्याची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.