

राजापूर (पुढारी वृत्तसेवा): राजापूर तालुक्यातील सागवे-नाखेरे गावात रस्त्याचे काम सुरू असताना जमिनीतून एक पुरातन तोफ सापडली आहे. ही तोफ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचा अंदाज वर्तवला जात असून, इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र या ऐतिहासिक शोधाची पुरातत्व विभागाने अद्याप दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी सदर तोफ गावातच एका सुरक्षित ठिकाणी ठेवली असून, तिचे योग्य जतन आणि संवर्धन व्हावे, अशी मागणी होत आहे. या तोफेच्या अभ्यासातून शिवकालीन लष्करी तंत्रज्ञान, भुईकोट किल्ल्यांचे रक्षण उपाय आणि तोफेच्या निर्मिती पद्धतीवर प्रकाश टाकता येऊ शकतो.
दरम्यान, रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाचे कार्यालय केवळ नावापुरते कार्यरत असून, कोकणातील ऐतिहासिक वारशाकडे त्यांचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. सहाय्यक आयुक्त विकास वाहणे यांच्याकडे या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे ते पुरेसा वेळ देत नाहीत, अशी तक्रारही ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
घेरा यशवंत गडाच्या संवर्धनाचे काम सुरू असताना त्याचं ढासळलेलं रूप आणि पाहणीसाठी अधिकाऱ्यांचा रात्रीचा दौरा हे पुरातत्व विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. सागवे-नाखेरेतील तोफ ही केवळ एक सुरुवात आहे – या भागात अधिक संशोधन केल्यास शिवकालीन संपत्ती आणि वस्तू मिळण्याची शक्यता आहे.
"शिवकालीन वारसा जपण्यासाठी या तोफेच्या संवर्धनाची तातडीने गरज आहे," असा सूर आता स्थानिक नागरिक, इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमी यांच्यातून उमटत आहे.