Sagave Historic Cannon
राजापूर: राजापूर तालुक्यातील सागवे, नाखेरे येथील रस्ता कामाच्या उत्खननात सापडलेल्या तोफेची दखल शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी घेतली आहे. शुक्रवारी (दि.६) त्यांनी सागवे परिसरातील तोफेची पाहणी केली. तोफेचे त्याच परिसरात जतन व्हावे, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक सागवे येथे आयोजित करण्याबाबतचे सुतोवाच यांनी यावेळी केले.
सागवे, नाखेरे येथे रस्त्याच्या कामादरम्यान सुरु असलेल्या खोदकामात एक तोफ सापडली होती. तोफ शिवकालीन युगातील असल्याची चर्चा देखील सुरु होती. सागवे, नखेंरे परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलाशी संबंधित सरदार तेथे वास्तव्य करून होते. त्यामुळे कदाचित त्यांच्या काळातील तोफ असावी.
आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठकीचे सागवे येथे आयोजन करून सापडलेल्या तोफेचे सन्मानाने जतन व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे संघटक भरत लाड, शिवसेनेचे निरीक्षक संदेश पटेल, ओंकार पेडणेकर आदी उपस्थित होते.
राजापूर तालुक्याला इतिहासकालीन वारसा लाभला आहे. ऐतिहासिक तालुका अशी ओळख आहे. त्या पार्श्वभुमीवर खोदकामात सापडलेल्या तोफेचे जतन त्याच परिसरात झाल्यास भविष्यात राजापूर तालुक्याचे पर्यटनात्मकदृष्टया आणखी महत्व वाढणार आहे.
सागवे, नाखेरे परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्या काळी प्रसिद्ध बंदर या परिसरात होते. मोठी जहाजे या बंदराला लागत असत. त्यामुळे सापडलेली तोफ पाहता या परिसरात आणखी ऐतिहासिक ठेवा सापडू शकतो. पुरातत्व विभागाने सर्व्हेक्षण करून उत्खनन करावे.संदेश पटेल, शिवसेना निरीक्षक