

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, मंगळवारीही हवामान खात्याने जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ दिला आहे. सोमवारी पहाटेपासून जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळला. यामुळे दापोलीमध्ये छोट्या नदीवरून पाणी गेल्याने एक प्रौढ वाहून गेला तर रविवारी रात्री चिपळूणमध्ये खडपोली नदीत मासेमारीसाठी गेलेल्या तिघांना प्रशासनाने रात्री सुरक्षित बाहेर काढले. पावसामुळे खेड-दापोली रस्त्यावरून पाणी गेल्याने हा मार्ग बंद होता तर गुहागरात पालशेत-हेदवी रस्त्यावर झाड पडल्याने तो मार्ग बंद होता.
रत्नागिरी तालुक्यातील कर्ले वालमवाड येथे समिक्षा संजय वालम यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळली. ही माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे सहकारी संजय हळदणकर, चंदन खानविलकर, गणेश भारती यांनी तातडीने ना. सामंत यांच्यावतीने पन्नास हजाराची मदत या कुटुंबाला दिली.
राजापूर तालुवक्यातील भराडीन बाणेवाडी येथे राधाबाई कृष्णा दळवी यांच्या घरावर झाड पडून सुमारे 15 हजाराचे नुकसान झाले. तुळसुंद डोर्लेकरवाडी येथे योजना यशवंत डोर्लेकर यांच्या घराचे पावसामुळे सुमारे 40 हजाराचे नुकसान झाले. मिळंद गावातील वसंत दीपाजी तावडे यांच्या दुकान गाळ्यावर आंब्याचे झाड पडून सुमारे 12 हजाराचे नुकसान झाले. प्रिंदवण तळे खाजणवाडी येथील विश्वनान नारायण गोखले यांच्या बंद घरावर आंब्याचे झाड पडून 20 हजाराचे तर धाऊलवल्ली येथील वसंत ज्ञानू सांडे यांच्या घराजवळील संरक्षण भिंत कोसळून सुमारे 40 हजाराचे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील करंजगाव येथे रस्ता खचला आहे. दापोली वणौशीत गोठा कोसळल्याने त्याखाली सहा गुरे अडकली होती. यातील एका गाईचा मृत्यू झाला.
चिपळूण पं.स. शिक्षण विभागाच्या सिमेंट पत्र्याचे पावसामुळे नुकसान झाले. वाघिवरे येथे घराची संरक्षक भिंत कोसळून सहा हजार रुपयांचे नुकसान, वाघिवरे येथेच ललीता कदम यांचे घराचे छप्पर कोसळून 55 हजाराचे नुकसान तर केतकी सोनारआळी येथील प्रकाश मेतकर यांची संरक्षक भिंत कोसळून सहा हजाराचे नुकसान झाले. संगमेश्वर येथे काटवलीत सिताराम गेल्ये यांच्या गोठ्याचे 71 हजाराचे नुकसान झाले. करंबळे तर्फे संगमेश्वर येथे जिल्हा परिषद मराठी शाळेची संरक्षक भिंत कोसळल्याने अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. तिवरे तर्फे देवळे येथे महादेव पाष्टे यांच्या घरावर फणसाचे झाड पडून तीस हजार तर किरडूवे येथे गजानन वैद्य यांच्या विहीरीचा बांध कोसळून 1 लाख 20 हजाराचे नुकसान झाले.
गुहागर तालुक्याती वेलदूर येथे यशवंत जांभारकर यांच्या शौचालय दगड माती कोसळून नुकसान झाले. पालशेत-हेदवी दरम्यान झाडाची फांदी पडल्याने रस्ता बंद झाला होता. वेलदूर ब्रीजवर नदीला आलेल्या मोठ्या पाण्यामुळे लाकडी ओंडके अडकले होते. कोतळूक किरवलेवाडी गंगाराम भेकरे यांच्या घराची पडवी व छप्पर कोसळून नुकसान झाले. आबलोली-तवसाळ मार्गावर झाड पडून मार्ग बंद पडला होता. बंदर वाडी येथे आदेश नाटेकर, साईनाथ हरचलकर यांचे नुकसान झाले. कोंढरकाळसूर येथे विहीरीचे बांधकाम कोसळून पंधरा हजाराचे नुकसान, वडद येथे संजय सोमण यांच्या घराचे छप्पर कोसळून नुकसान झाले आहे. गेल्या चौवीस तासात जवळपास पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले आहे.