Pandharinath Amberkar Bail
रत्नागिरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला वैद्यकीय कारणास्तव सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भात रत्नागिरी सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी सशर्त जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा थार वाहनाखाली चिरडून खून केल्याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पोलिसांनी आंबेरकरला अटक केली होती. यापूर्वी त्याने तीन वेळा जामिनासाठी अर्ज दाखल केले होते; मात्र ते सर्व अर्ज फेटाळण्यात आले होते.
वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या नव्या अर्जात आंबेरकर याच्यावतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, खटला सुरू असून आतापर्यंत १७ सरकारी साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. या साक्षीदारांच्या जबाबांतून कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. राजकीय पार्श्वभूमीमुळे आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा करत आरोपी सध्या तीव्र मानसिक तणावाखाली असून वैद्यकीय अहवालांनुसार तो मानसिक आघाताने ग्रस्त असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे उपचारासाठी अल्पकालीन जामीन देण्याची विनंती करण्यात आली.
मात्र, तपास अधिकाऱ्यांनी या अर्जाला तीव्र विरोध केला. गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून यापूर्वी जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास असून मुंबई उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. तसेच आरोपी साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो, प्रलोभन देऊ शकतो किंवा पळून जाण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, आरोपीवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असले तरी तोही माणूस आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय कारणांवरून गंभीर गुन्ह्यांतही जामीन देण्यात आल्याचे न्यायनिवाडे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे कठोर अटी घालून आरोपीस सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन देणे उचित ठरेल, असे नमूद करत न्यायालयाने आंबेरकरला सशर्त दिलासा दिला आहे.