

रत्नागिरी : हेरॉईनसदृश अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले आहे. हे अमली पदार्थ त्यांनी मुंबईतून आणल्याचे तपासात पुढे येत आहे. त्यामुळे मुख्य आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायालयाने 3 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गांजा, चरस, विविध प्रकारच्या पावडर स्वरुपात असणारे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींना यापूर्वी पकडले आहे. जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी मिशन फिनिक्स राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ चार आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून 30 ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ताहिर रफिक कोतवडेकर (रा. थिबा पॅलेस रोड), रिझवान अश्रफ नावडे (रा. राजीवडा), आकिब जिक्रिया वस्ता (रा. राजीवडा) आणि रफत करीम फणसोपकर (रा. राजीवडा) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदिप ओगले, पोलिस हवालदार शांताराम झोरे, विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर आणि पोलिस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यापूर्वीही या पथकाने वेगवेगळ्या अंमली पदार्थ प्रकरणी कारवाया केल्या आहेत.