

दापोली : दापोली तालुक्यातील आडे, उटंबर लगतच्या गावामध्ये सध्या जुलाबाच्या साथीने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत गावातील 30 ते 40 ग्रामस्थ या आजाराने त्रस्त आहेत. दूषित पाणी प्यायल्यामुळे ही साथ पसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाधितांमध्ये लहान मुले, वृद्ध आणि महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. रुग्णांना जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना तातडीने उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीत स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र, दापोली उपजिल्हा रुग्णालय, काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गावात अचानक एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत दूषीत झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी तातडीने या पाणी स्त्रोतांची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मागणी केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाने गावात सर्वेक्षणाचे काम हाती घेण्याची मागणी होत आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यात उपचार घ्यावेत. रोगराई अधिक पसरण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच पाण्याचे शुद्धीकरण आणि जंतूनाशक फवारणी युद्धपातळीवर राबवावी, अशी मागणी आडे, उटंबर ग्रामस्थांनी केली आहे.