गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण विकास यंत्रणा रत्नागिरी आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 28 डिसेंबर या कालावधीत जिल्हास्तरीय सरस विक्री प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून हे प्रदर्शन खास आकर्षण ठरले आहे.
या जिल्हास्तरीय प्रदर्शनात कोकणातील विविध उत्पादने व रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद पर्यटकांना मिळत आहे. तसेच एकाच ठिकाणी एकाचवेळी विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना मिळत असल्याने एक सर्वोत्तम दर्जाची मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे मत पर्यटकांकडूनच व्यक्त होत आहे. तसेच अतिशय माफक दरात चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळत असल्याने पर्यटकांची पसंती बचत गटांच्या स्टॉलला मिळत आहे. या प्रदर्शनात बचत गट महिलांकडून निर्मित असलेल्या हस्तकला, विणकाम, बुरुडकाम, शोभिवंत वस्तू व झाडे, कपडे, कोकणी उत्पादने उत्पादने आणि खाद्यपदार्थांमध्ये खास रुचकर कोकणी पदार्थांना पर्यटकांचा वाढता प्रतिसाद तीन दिवसीय कालावधीत मिळाला असून पर्यटकांची पर्यटकांची चांगलीच गर्दी या प्रदर्शनात खरेदीसाठी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
24 डिसेंबरला या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते झाल्यानंतर या प्रदर्शनाला विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन बचत गट स्टॉलधारकांना भेटी देऊन त्यांच्या दर्जेदार उत्पादने व व खाद्यपदार्थांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच या प्रदर्शनात अनेक प्रतिष्ठित नागरिकांनीही भेटी देऊन बचत गटांच्या महिलांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे या सरस प्रदर्शनात महिला बचत गट स्टॉलधारकांकडून येणाऱ्या पर्यटकांना आपापल्या उत्पादनाची माहिती देऊन चांगल्या प्रकारे आपल्या मालाची विक्री करण्यासाठी मोठी मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. एकूणच रविवारपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात सुमारे 50 लाखांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होईल असे सांगण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी
या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनात महिला बचत गटांना आपआपल्या मालाची विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत; परंतु संबंधित यंत्रणांकडून या प्रदर्शनात महिलांना त्यांच्या कलेला वाव मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून सायंकाळच्या सत्रात बचत गटांच्या महिला भगिनींकडून अतिशय दर्जेदार व रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत आहेत. त्यामुळे पर्यटकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची एक मेजवानी उपलब्ध झाली आहे.