

वैभव पवार
गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर जयगड पोलिस ठाण्याकडून विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मंदिर परिसर आणि समुद्र किनाऱ्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान, किनाऱ्यावरील गर्दीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून जादा पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी गणपतीपुळे येथे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जयगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी व रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
सध्या या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी नाताळ पर्यटन हंगाम सुरू असल्याने विविध ठिकाणचे पर्यटक दाखल होत असून, थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या येथील किनाऱ्यावर दाखल झालेल्या पर्यटकांकडून येथील देवदर्शन आणि समुद्रस्नानाचा विशेष आनंद लुटला जात असून समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट आणि उंच आकाशातील पॅराग्लायडिंगलाही पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे.
विस्तीर्ण किनाऱ्यावरील वाळूमध्ये उंट, घोडे सफारी, एटीव्ही बाईक राईड आदींचा आनंद पर्यटक लुटत आहेत.एकूणच गणपतीपुळे तीर्थक्षेत्राकडे राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांची पावले आता वळू लागली असून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गणपतीपुळे पर्यटनस्थळ सज्ज झाले आहे. याच ठिकाणी सध्या जिल्हास्तरीय सरस महिला बचत गटांचे प्रदर्शन सुरू असल्याने या प्रदर्शनाला पर्यटकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत त्यामुळे थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लाखो पर्यटक भेट देतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.