Red Sandalwood Tree 
रत्नागिरी

Red Sandalwood Tree | चाफवलीतील रक्तचंदन झाडाला विशेष सुरक्षा

Red Sandalwood Tree | 150 वर्षांपासून झाड ग्रामस्थ आणि वन विभागाच्या संरक्षणात

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : सागर मुळ्ये

शर्यतीतील नामांकित बैल किंवा घोड्यांना विशेष संरक्षण दिले जाते, हे सर्वश्रुत आहे. मात्र एखाद्या झाडाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थ, वन विभाग, विविध संस्था एकत्रितपणे पहारा देत असतील, तर ते आश्चर्यकारक वाटू शकते. संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावात असेच एक दुर्मीळ व कोट्यवधी रुपयांचे रक्तचंदनाचे झाड अनेक वर्षांपासून संरक्षणात ठेवण्यात आले आहे.

चाफवलीच्या वनराईत उभे असलेले हे रक्तचंदनाचे झाड सुमारे १५० वर्षे जुने असल्याचे मानले जाते. सुमारे ८० फूट उंच आणि १२ फूट घेर असलेले हे भव्य झाड कोकणातील दुर्मीळ नैसर्गिक वारंशापैकी एक मानले जाते. सामान्यतः रक्तचंदनाची झाडे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत आढळतात.

त्यामुळे कोकणातील हे झाड विशेष महत्त्वाचे ठरते. ग्रामस्थांना सुरुवातीला हे झाड रक्तचंदनाचे असल्याची कल्पना नव्हती. कातकरी समाज त्याच्या सालीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून विविध आजारांवर करत असे. पुढे काही अभ्यासकांनी त्याची तपासणी केल्यानंतर ते रक्त्तचंदनाचे असल्याचे स्पष्ट झाले.

झाडाच्या आर्थिक मूल्याची माहिती समोर आल्यानंतर ते विकून गावातील मंदिर उभारण्याचा विचारही काही ग्रामस्थांनी मांडला होता. मात्र, २०१३ मध्ये देवरुख येथील राजू काकडे अॅकॅडमी या संस्थेने पुढाकार घेत झाड संवर्धनाची चळवळ उभी केली. २१ ऑगस्ट २०१३ रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी तब्बल १४ फूट लांबीची राखी तयार करून झाडाला बांधण्यात आली.

आता वृद्धत्वाची चाहूल...

सध्या हे झाड वृद्धत्वाकडे झुकत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. झाडापासून पडणाऱ्या बियांपासून नवीन रोपे तयार करून ती विविध ठिकाणी लावली जात असली, तरी मूळ झाडाचे भवितव्य काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने या दुर्मीळ नैसर्गिक वारशाच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT