Aniket Kadam Ratnagiri
खेड : राज्य शासनाने महसूल वाढीसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कृत्रिम वाळू धोरण राबवण्याचा घेतलेला निर्णय सकारात्मक आणि स्वागतार्ह असल्याचे मत उद्योजक अनिकेत कदम यांनी व्यक्त केले.
भारणे नाका येथील साई रिसॉर्ट येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शासनाच्या कृत्रिम वाळू धोरणाविषयी जनजागृती करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कदम म्हणाले की, साई क्रश सँड उद्योग गेल्या काही वर्षांपासून विविध बांधकामांसाठी लागणारी कृत्रिम वाळू तयार करून पुरवठा करत आहे. कृत्रिम वाळूच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्वामित्वधनात मोठी कपात करून ६६० रुपयांऐवजी २०० रुपये प्रतिब्रास आकारण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे.
जिल्ह्यात शासनाचे सर्व निकष पूर्ण करणारा कृत्रिम वाळू पुरवठादार म्हणून साई क्रश सँडकडून शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात कृत्रिम वाळू उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नैसर्गिक गाळातून काढण्यात येणारी वाळू आणि नदीतील गाळातील गोट्यांवर यंत्राद्वारे प्रक्रिया करून तयार करण्यात येणारी कृत्रिम वाळू यामध्ये मोठा फरक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नैसर्गिक वाळू उपशामुळे नदी पात्राच्या मूळ स्वरूपाला धक्का बसतो, तसेच गाळातील गोटे नदीतच राहिल्याने नदी पात्र गाळाने भरून जाते.
मात्र, नदीतील गोट्यांचा उपयोग कृत्रिम वाळू निर्मितीसाठी केल्यास नदी पात्र गाळमुक्त होऊन पर्यावरणालाही फायदा होतो, असे कदम यांनी सांगितले. शासनाने तयार केलेल्या कृत्रिम वाळू धोरणाची अधिक वेगाने अंमलबजावणी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.