

Khed Ashwini Kedari death
खेड : खेड तालुक्यातील पाळू गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेली अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिने २०२३ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत मुलींमध्ये संपूर्ण राज्यात पहिली येण्याचा मान मिळवला होता. तिच्या यशाने केवळ खेड तालुक्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले होते. पण, नियतीच्या क्रूर खेळाने या तेजस्वी ताऱ्याला कायमचे झाकले.
२८ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे, अभ्यासात मग्न असलेली अश्विनी अंघोळीसाठी पाणी तापवत होती. पाणी तापले आहे का, हे तपासताना हिटरमुळे झालेल्या अपघातात तिच्या अंगावर उकळते पाणी सांडले आणि ती ८० टक्के भाजली. पिंपरी-चिंचवड येथील डी.वाय.पाटील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि अनेकांनी तिच्या उपचारासाठी आर्थिक मदत उभी केली. पण, मृत्यूशी झुंज देणारी ही धीरोदात्त मुलगीने अखेर आज (दि. ८) अखेरचा श्वास घेतला.
हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या अश्विनीने आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. तिचे स्वप्न होते जिल्हाधिकारी होण्याचे. त्या स्वप्नाला तिने आपल्या कठोर परिश्रमाने जवळ आणले होते. पण, नियतीने तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्याची संधीच दिली नाही. अश्विनीच्या निधनाने खेड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. तिच्या जाण्याने एका मेहनती, प्रेरणादायी मुलीला आपण गमावले आहे. तिची आठवण आणि तिचे स्वप्न कायम आपल्याला प्रेरणा देत राहतील.